आरामदायी प्रवासाचा पर्याय एसटीच्या ई-बस ; महामंडळाचा नफा वाढणार

- अधिक सुखद, सुरक्षित प्रवास होणार

    पुणे / मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी  अनेक पावले उचलली आहेत, या अनुषंगाने मुंबई – पुणे दरम्यान धावणाऱ्या शिवनेरी एसी बसेसचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. या मार्गावर धावणाऱ्या १०० एसी बसेसपैकी तीन-चतुर्थांश बसेसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्यात आले असून दिवाळीपासून मुंबई – पुणे मार्गावर सगळ्याच ई बस  धावतील.

    या मार्गावर इलेक्ट्रिक बस धावू लागल्या त्या दिवसापासून महामंडळाला नफा मिळू लागल्याने एसटी प्रशासनात ई बस बाबत उत्सुकता आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १  मे रोजी ई – शिवनेरी बसेस लाँच केल्या होत्या आणि लॉन्च केल्याच्या महिनाभरात मुंबई – पुणे मार्गावर धावणाऱ्या या प्रीमियम ब्रँड शिवनेरी एसी इलेक्ट्रिक बसने 2 कोटी रुपयांचा महसूल मिळवला.  याबाबत एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले की, या महामार्गावर महामंडळाला  प्रति किमी ७० रुपये उत्पन्न मिळत आहे. हा एक अतिशय सकारात्मक परिणाम आहे. इतकेच नव्हे तर एमएसआरटीसीचा हा उपक्रम गेम चेंजर ठरणार आहे.

    ... सुसज्ज ई-बस  
    यापूर्वी  दादर, ठाणे आणि बोरिवली येथून पुण्याला जाणाऱ्या ११६ व्होल्वो बस या मार्गावर धावत होत्या.  काही दिवसांनी या सर्व बसेस इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. इलेक्ट्रिक बसेसमध्ये वाय – फाय, मोबाईल चार्जिंग, सीट लाइट, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सर्व सुखसोयी आणि सुविधा असतील, असा निर्णयही घेण्यात आला. प्रशासनाच्या या निर्णयाचा फायदा झाला असून ई-बसमुळे मुंबई ते पुणे दरम्यानचा साडेतीन तासांचा प्रवास सुखकर  झाला आहे. सध्या या मार्गावर ३०० फेऱ्या सुरुु आहेेत. याचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे याचे एकवेळ रिचार्जमध्ये एक बस ३०० किमी पर्यंत चालवली जाते.   प्रवाशांना अखंडित सेवा मिळावी यासाठी मुंबई-पुणे मार्गावर ई-चार्जिंग पॉइंट उभारण्यात येत आहेत. या जलद चार्जिंगमुळे बस 2 तासांत पूर्णपणे रिचार्ज होतील, असेेही शेेेखर चन्ने म्हणाले.

    …प्रवासी संख्या वाढली
    भाड्याचा विचार केला तर पुरुषांसाठी मुंबई ते पुण्याचे भाडे ५२५ रुपये आणि ठाणे ते ५१५ रुपये आहे. तर महिलांसाठी २७५ रुपये आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात एकूण १४००० बसेस असून ५००० डिझेल बसेसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय अलीकडच्या काळात एसटी प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयांचाही परिणाम दिसून येत असून वर्षभरापूर्वी एसटी बसमधून दररोज केवळ ३ लाख प्रवासी प्रवास करत होते, आता त्यांची संख्या १८ पटीने वाढून ५४ लाखांवर पोहोचली आहे.

    आमच्या प्रवाशांना आरामदायी प्रवास देताना आम्ही पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. ई-बसची अखंडित सेवा सुनिश्चित करण्यासाठी, मुंबई पुणे मार्गावर ई-चार्जिंग पॉइंट उभारण्यात येत आहेत. या जलद चार्जिंगमुळे बस २ तासांत पूर्णपणे रिचार्ज होतील.

    शेखर चन्ने, एमडी-एमएसआरटीसी