कंत्राटी लिपिक लाचलुचपच्या जाळ्यात ; २० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

कराड प्रांत कार्यालयातील भूसंपादन शाखेतील कंत्राटी तत्वावरील दोन लिपिकांना वीस हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.शुक्रवारी सकाळी  ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

    सातारा :  कराड प्रांत कार्यालयातील भूसंपादन शाखेतील कंत्राटी तत्वावरील दोन लिपिकांना वीस हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.शुक्रवारी सकाळी  ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

    रामचंद्र श्रीरंग पाटील (वय ७०, लिपिक भूसंपादन शाखा, प्रांत कार्यालय कराड), दिनकर रामचंद्र ठोंबरे (वय ७०, लिपिक भूसंपादन शाखा, प्रांत कार्यालय कराड) कंत्राटी तत्वावर काम करतात. तक्रारदार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अाहेत. येरवळे तालुका कराड येथील नऊ शेतकऱ्यांकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेत विविध शासकीय कार्यालयात पाठपुरावा करण्यासाठी प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे. त्यानुसार तक्रारदार उपविभागीय अधिकारी कार्यालयातात मूल्यांकन प्रक्रियेबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेले होते.

    त्यावेळी कंत्राटी लिपिकांनी मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली. यासंदर्भात तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक िवभागाच्या सातारा शाखेच्या उपअधीक्षक उज्वल वैद्य यांच्याकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर सावंत, निलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे यांनी दि. १६ मे व १७ मे रोजी पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी सकाळी प्रांत कार्यालयात सापळा रचला आणि पाटील व ठोंबरे यांना प्रत्येकी १० असे मिळून २० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्यावर कराड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईबद्दल पथकाचे अभिनंदन केले.