देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्यास ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल व २ जिवंत काडतूसे जप्त केली आहेत.

    पुणे : बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल व २ जिवंत काडतूसे जप्त केली आहेत.

    आदिल करीम बागवान (वय ३५, रा. मार्केटयार्ड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस अंमलदार सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, विजय गुरव, सैदोबा भोजराव, शंकर संपते, पवन भोसले व त्यांच्या पथकाने केली आहे.

    पुणे पोलिसांकडून पाहिजे व फरार आरोपींचा माग काढला जात आहे. गुन्हे शाखेकडून हद्दीत गस्त व पेट्रोलिंग घातली जात आहे. यादरम्यान, खंडणी विरोधी पथक दोनचे कर्मचारी हे कोंढवा भागात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व सचिन अहिवळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार आदिल बागवान हा मॅपल गार्डन येथे थांबलेला असून, त्याच्याकडे पिस्तूल आहे. त्यानूसार, पथकाने या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतूसे मिळून आली. त्याच्यावर गुन्हा नोंद करत त्याला अटक केली. त्याच्याकडे पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

    आदिलवर विविध पोलीस ठाण्यात ५५ गुन्हे

    आदिल बागवान हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर सर्वाधिक गुन्हे अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल आहेत. त्यासोबतच दरोडा, घरफोडी, दुखापत, जबरी चोरीचेही गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, वारजे माळवाडी, सांगवी, कोंढवा, मार्केटयार्ड, सहकारनगर, कोथरूड, खडक, स्वारगेट, भारती विद्यापीठ, पर्वती, वानवडी, येरवडा, हिंजवडी, हडपसर या पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल ५५ गुन्हे दाखल आहेत.