वहिनीचा खून करून सराईत गुन्हेगाराची मटण पार्टी; ‘असा’ झाला उलघडा

भावाच्या पत्नीचा भावाच्याच मदतीने डोक्यात दगड घालून खून केल्यानंतर मृतदेह पाचार्णे गावच्या डोंगरात खड्डा करून पुरला आणि प्रेताची विल्हेवाट लावली.

    पुणे : भावाच्या पत्नीचा भावाच्याच मदतीने डोक्यात दगड घालून खून केल्यानंतर मृतदेह पाचार्णे गावच्या डोंगरात खड्डा करून पुरला आणि प्रेताची विल्हेवाट लावली. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर मटनाची पार्टी देखील केली. हा गुन्हा केल्यापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला लोणीकंद पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

    गणेश रामभाऊ चव्हाण (वय २१, रा. शिरगाव परंदवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी सारखे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अजित फरांदे व त्यांच्या पथकाने केली आहे.

    पिंपरी चिंचगवड आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात गणेश चव्हाण हा पाहीजे आरेापी होता, अशी माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. त्याने शिरगाव परंदवाडी येथे त्याची भावजय सुनंदा चव्हाण हिचा भाऊ व तिचा पती लक्ष्मण चव्हाण याच्याच मदतीने डोक्यात दगड घालून खून केला होता. खूनानंतर मृतदेह गावाजवळच असणार्‍या पाचार्णे गावच्या डोंगरात नेवुन तिथे टिकावाने खड्डा खोदला. तसेच, मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. अत्यंत शांत डोक्याने हा खून करून पुरावा नष्ठ केल्यानंतर घरी येऊन दारू व मटनाचे जेवण बनवत पार्टी देखील केली होती.

    दरम्यान, आरोपी हा लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची माहिती पोलिस नाईक अजित फरांदे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांना याची माहिती दिली. त्यानुसार गणेश चव्हाणला लोणीकंद येथील जिल्हा परिषद शाळेपासून ताब्यात घेतले.

    त्याच्याकडे प्राथमिक तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी परंदवाडी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक सचिन सुर्यवंशी यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले आहे. त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्यात मोक्काची कारवाई झाली आहे. या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी होता.