पुणे-पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीवरुन जुंपली, बिनविरोध करण्याचा शिंदे-भाजपाचा आग्रह, तर संजय राऊत म्हणतात…

महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. त्याची कशी रोज पायमल्ली होतेय हे कोणी सांगायला नको. पंढरपूर आणि नांदेड पोटनिवडणुकीत ही संस्कृती दिसली नाही. मुंबईत दिसली होती, असही राऊत म्हणाले.

  मुंबई– पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth) तर चिंचवडमध्ये भाजपा दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जागी पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी २७ फेब्रुवारी तारखेला मतदान होणार आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उतरणार की नाही? याबाबतचा अजूनही सस्पेन्स कायम आहे. निवडणूक लढवायची की नाही? यावर ठाकरे गटाने चर्चा केली. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत उद्याच निर्णय होणार असल्याचं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलंय.

  लवकरच निर्णय घेऊ…

  दरम्यान, निवडणूक लढायला हरकत नाही असा कालच्या बैठकीचा सूर आहे. जरी निवडणुकीतून दूर राहिलो तरी ती निवडणूक होणार आहे. काही प्रमुख अपक्ष निवडणुकीत उतरतील. त्यामुळे निवडणूक होईल, तसेच ही निवडणूक कशा प्रकारे टाळता येईल का यावरही चर्चा झाली. कारण निवडणूक लढवणारे मृत आमदारांच्या घरातील लोकं आहेत. या संदर्भातील बैठकीला उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित होते. त्यामुळे इतर सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि निवडणूक लढवावी की नाही यावर निर्णय घेऊ, असंही राऊत म्हणाले.

  त्यावेळी संस्कृती आठवली नाही का?

  नांदेड, पंढरपूरच्या निवडणुकाही झाल्या. अंधेरीचीही निवडणूक बिनविरोध झाली नाही, निवडणूक झाली.  त्यावेळी मृत आमदारांच्या घरातील लोकच निवडणुकीला उभे होते. अंधेरीची निवडणूकीचा अपवाद होता. त्याची कारणं वेगळी आहेत. शिवाय भाजपला जिंकण्याची संधी नव्हती, असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. त्याची कशी रोज पायमल्ली होतेय हे कोणी सांगायला नको. पंढरपूर आणि नांदेड पोटनिवडणुकीत ही संस्कृती दिसली नाही. मुंबईत दिसली होती, असही राऊत म्हणाले.

  या नावांची चर्चा…

  या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची परवा बैठक घेतली आहे. तसेच आज देखील भाजपाची महत्त्वाची बैठक होणार असून, दरम्यान, बैठकीनंतर उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. कसबा पेठेतून शैलेश टिळक, हेमंत रासणे, गणेश बिडकर आणि धीरज घाटे ही चार नावं चर्चेत आहेत. पुणे शहर भाजपकडून पक्षश्रेष्ठीना पाठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कसबा पेठेतून कोण लढणार यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या तरी कमळ चिन्ह हाच उमेदवार मानून भाजपा कामाला लागली आहे.

  नावे जाहीर होणार…

  दरम्यान, पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कोण उमेदवार असेल, यावरून आज महत्त्वाची बैठक होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात ही बैठक होणारेय. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जातेय का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र चंद्रकांत पाटील हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल असं म्हटलं आहे.