वाढीव रक्कमेची घोषणा हवेत; शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार ऐवजी दोनचं हजार

एकीकडे शेतकरी संकटात आहे. राज्यातील काही भागात पाऊस अधिकचा झाला तर काही भागात अल्प झाला. ज्या भागात अल्प पाऊस झाला तेथे दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी अडकला आहे तर जेथे अधिकचा पाऊस झाला तेथे ओल्या दुष्काळाने शेतकरी अडचणीत आला आहे.

  आटपाडी : केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना लागू केली. या योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टप्या- टप्याने जमा केले जात होते. याच धर्तीवर राज्य शासनानेही १२ हजार रुपयांची वाढ करून २४ हजार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची घोषणा केली. मात्र राज्य सरकारने यात बदल केला आणि ही योजना उशीराने अंमलात येणार असल्याचे सांगितले. यामुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची वारंवार चेष्टाच केली जात आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

  केंद्र शासनाकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लागू केली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा होवू लागले. वर्षाला सहा हप्यात १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील तिन वर्षापासून जमा होण्यास सुरुवात झाली. राज्यातील सरकार बदलल्यानंतर शिंदे सरकारने शेतकऱ्यांनाही राज्य सरकार केंद्र सरकारप्रमाणे मदत करेल, अशी घोषणा केली. तर ही मदत या १४ व्या हप्यापासून दिली जाणार असल्याचे जाहीर केले.

  एकीकडे शेतकरी संकटात आहे. राज्यातील काही भागात पाऊस अधिकचा झाला तर काही भागात अल्प झाला. ज्या भागात अल्प पाऊस झाला तेथे दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी अडकला आहे तर जेथे अधिकचा पाऊस झाला तेथे ओल्या दुष्काळाने शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे केंद्र आणि राज्य शासनाची ही योजना शेतकऱ्यांना तारणार असल्याचे अनेक शेतकरी बोलून दाखवत होते. मात्र राज्य शासनाने यामध्ये यु टर्न घेत ही योजना सध्या लागू झाली नाही. मंत्री मंडळाचा निर्णय झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातील, अशी भुमिका घेतली. यामुळे शेतकरी वर्गात राज्य शासनाच्या विरोधात सध्या चिड निर्माण झाली आहे.

  शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजन

  शेतकरी एकीकडे खुश झाला होता कारण आता २ हजाराऐवजी ४ हजार रुपये मिळणार या आनंदात शेतकरी वर्ग होता आणि हा हप्ता कधी जमा होईल याची वाट प्रत्येक शेतकरी लाभार्थी पाहत होता. दि. २८ जुलै २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारचे २ हजार रुपये जमा झाले. मात्र या सोबत राज्य सरकारचे २ हजार रुपये जमा न झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

  राजकीय नेत्यांचे फाेटाेसेशेन

  मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्याने अनेकांच्या शेतीतील पिकांची वाढ थांबली आहे. मक्यावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव असून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यातच शासनाकडून कोणतीही मदत किंवा घोषणाही अद्याप झालेली नाही. अजून प्रशासनाकडून पंचनामेही केले जात नाहीत. केवळ राजकीय नेते मंडळी बांधावर येवून फोटो काढून निघून जात आहेत. मदत कधी देणार अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

  जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार

  एकीकडे शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अगोदरच सरकारच्या धोरणा विरोधात तिव्र नाराजी व्यक्त करत आहे आणि अशातच शेतकऱ्यांनी कोणतीही मागणी न करता राज्य सरकारने दोन हजार रुपयांची घोषणा केली. ही घोषणा हवेतच विरगळली काय? केवळ शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार घोषणा करत आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार राज्य सरकार करत असल्याची तिव्र भावना शेतकरी वर्गातून होत आहे.