किरकोळ कारणावरून झाला वाद; रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या

शेजारी राहणाऱ्या तरुणीला शिवीगाळ करण्यापासून मनाई केल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बाप-लेकाने रेल्वे कर्मचारी तरुणाच्या छातीत चाकूने भोसकून हत्या केली. ही थरारक घटना इमामवाडा पोलिस ठाण्यांतर्गत बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  नागपूर : शेजारी राहणाऱ्या तरुणीला शिवीगाळ करण्यापासून मनाई केल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बाप-लेकाने रेल्वे कर्मचारी तरुणाच्या छातीत चाकूने भोसकून हत्या केली. ही थरारक घटना इमामवाडा पोलिस ठाण्यांतर्गत बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  महेश विठ्ठल बावणे (वय 23, रा. जाटतरोडी, इंदिरानगर) असे मृताचे नाव आहे. खुनानंतर फरार झालेल्या बापलेकाला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली. शंकर उर्फ शेरू भोलासिंग राठोड (वय 52) आणि ऋतिक शंकर राठोड (वय 22, रा. इंदिरानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना फरार होण्यास मदत करणाऱ्यांनाही पोलिस आरोपी बनवू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

  महेशचे वडील विठ्ठल रेल्वेत नोकरीला होते. त्यांच्या मृत्यूनंतर महेशला अनुकंपा तत्वावर इलेक्ट्रिकल विभागात नोकरी मिळाली. आरोपी शंकर याच्यावर खून आणि मारहाणीसह अनेक जुने गुन्हे नोंद आहेत. ऋतिकविरुद्धही मारहाणीचा गुन्हा नोंद आहे. परिसरात शंकरची दहशत आहे. तो अवैध सावकारीचा व्यवसाय करतो. महेशच्या घरी गुरुवारी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  संपूर्ण कुटुंब तयारीला लागले होते. दरम्यान, शंकर परिसरात आला. शेजारी राहणाऱ्या अनिशा इंगोले यांना शिविगाळ करत ‘तुझी आई कुठे आहे, फोन उचलत नाही आणि पैसेही देत नाही’, असे म्हटले. शिविगाळ होत असल्याने महेश बाहेर आला. त्याने शंकरला शिविगाळ करण्यास मनाई केली आणि इंगोले यांच्या घरी जाऊन बोलण्यास सांगितले. यामुळे शंकर चिडला.

  ‘तुला आता धडा शिकवतो’ असे म्हणत घरी गेला आणि चाकूसह परतला. त्याच्या मागे ऋतिकही तेथे आला. दोघांनीही महेशला मारहाण केली. ऋतिकने महेशचे दोन्ही हात पकडून ठेवले आणि शंकरने त्याच्या छातीत चाकू भोसकला.

  आरडा-ओरड झाल्याने आरोपी बापलेक पळून गेले. इमामवाडा पोलिस घटनास्थळावर पोहोचले. गंभीर जखमी महेशला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुन्हे शाखा युनिट 4 चे पथकही आरोपींचा शोध घेत होते. गुरुवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास पथकाने शंकरला दिघोरी परिसरातून अटक केली.