ऐन दिवाळीत आंदाेलनाचा भडका; कोल्हापुरातील अकिवाटमध्ये ऊस वाहतुकीची वाहने पेटविली

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऐन दिवाळीत ऊसदर आंदोलनाचा भडका उडाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे ऊस वाहतूक करणाऱ्या गाडीला पेटवण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऐन दिवाळीत ऊसदर आंदोलनाचा भडका उडाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे ऊस वाहतूक करणाऱ्या गाडीला पेटवण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याचे हे वाहन असल्याची माहिती समोर आली आहे. आमच्याच कार्यकर्त्यांनी वाहन पेटविल्याचा दावा अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात ऊस आंदोलन पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  मागील चारशे रुपये फरक द्यावा, तसेच यंदाच्या गळीत हंगामात ३५०० रुपये उसाला दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, अन्य संघटनेने आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाची व्याप्ती जिल्ह्यात वाढू लागली असून, ऊस तोडणी थांबवण्यात आली आहे. काही कारखान्यांनी हंगाम सुरू करण्यासाठी मजूर आणले असून शेतकऱ्यांची ऊस तोडले जात आहेत.

  मात्र शेतकरी संघटनांनी या तोडण्या बंद पाडल्याने कारखान्याला भरून जाणारा ऊस शेतकऱ्यांनी रोखून धरला आहे. जिल्ह्यातील कारखान्यांचे ऊस घेऊन जात असताना अनेक ठिकाणी ट्रॅक्टरातील हवा सोडण्यात येत आहे. ऊस तोडणी मजुरांना हाकलून लावले जात आहे. टाकळीवाडी येथे ऊस घेऊन जाणारी वाहने अडवून कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिला. हातकणंगले येथेही कार्यकर्त्यांनी वाहनधारकांना रोखल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या विरोधात कार्यकर्त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या मारून आंदोलन केले.

  शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

  उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलथवून टाकण्याचा प्रकार टाकळीवाडी येथे घडला. तर रात्री वारणा साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला. वाठार-पारगाव रस्त्यावरील चावरे फाट्याजवळ ही घटना घडली आहे. गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन ३५०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. राजू शेट्टी यांना राजकीय आव्हान मिळू लागले असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे.

  कारखानदार समर्थकांना धक्काबुक्की

  सकाळी शिरोळ तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये उसाच्या गाड्या रोखण्यात आल्या. चाकातील हवा सोडून देण्यात आली. टाकळीवाडी या गावात तर आंदोलनाचा भडका उडाला. येथील काही शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देण्यात आम्हाला रोखू नका, असे म्हटले होते. त्याला शेतकरी संघटनांनी आव्हान दिले. टाकळीवाडी येथे साखर कारखान्याजवळ असलेल्या उसाच्या फडात जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलक अंकुश यांच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. यावेळी साखर कारखानदार समर्थकांना धक्काबुक्की करण्यात आली. शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला.

  हातकणंगले पोलीस ठाण्यावर मोर्चा

  संतप्त आंदोलकांनी ऊसाच्या गाड्या उलथवून टाकल्या. आंदोलनाची वाढती तीव्रता पाहून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. साखर कारखाने व परिसरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. कारखानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.