तडीपार आरोपीला अटक करताना पोलिसांच्या अंगावर सोडला कुत्रा

पिंपरी चिंचवड पोलीस तडीपार आरोपीला अटक करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांच्या अंगावर आरोपीच्या भावाने कुत्रा सोडला. कुत्र्याने चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला चावा घेतला. पोलिसांनी तडीपार आरोपीला अटक केली आहे.

    पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस तडीपार आरोपीला अटक करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांच्या अंगावर आरोपीच्या भावाने कुत्रा सोडला. कुत्र्याने चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला चावा घेतल्याने आरोपी नको कुत्रं आवर म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली. पोलिसांनी तडीपार आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी म्हातोबानगर, वाकड येथे घडली.

    पोलीस नाईक संदीप पाटील असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र प्रकाश घाडगे (वय २४, रा. म्हातोबानगर, वाकड), सागर प्रकाश घाडगे (वय २७, रा. म्हातोबानगर, वाकड), अशोक तुपेरे (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी रवींद्र घाडगे याला १ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. तसेच त्याने गांजा बाळगला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने पोलीस हवालदार प्रदीप शेलार आणि पोलीस नाईक संदीप पाटील आरोपीच्या घरी गेले.

    आरोपी रवींद्र घाडगे याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार २५० रुपये किंमतीचा ८१० ग्रॅम गांजा, १ हजार ७०० रुपये रोख रक्कम, २० हजारांचा मोबाईल फोन असा ४१ हजार ९५० रुपयांचा ऐवज आढळला. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने हा गांजा अशोक तुपेरे याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपी रवींद्र याचा भाऊ सागर हा पोलिसांच्या अंगावर धावून गेला. माझ्या भावाला सोडा, तुमचा काय संबंध. एकेकाला बघून घेतो असे म्हणत त्याने त्याचा कुत्रा पोलिसांच्या अंगावर सोडला. कुत्र्याने पोलिसांवर हल्ला केला. पोलीस नाईक संदीप पाटील यांच्या पायाला कुत्र्याने चावा घेतल्याने ते जखमी झाले. आरोपी सागर हा तिथून पळून गेला. तर रवींद्र घाडगे याला पोलिसांनी अटक केली. वाकड पोलीस सागरचा तपास करीत आहेत.