‘फेसबुक फ्रेंड’चं अपहरण केलं अन् तिच्याच वडिलांना धमकावलं; पोलिसांत गुन्हा दाखल

एका तरुणाने फेसबुकवर अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. अपहरण करून तिला आपल्या घरी घेऊन गेला. पीडितेचे आई-वडील त्याच्या घरी पोहोचले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

    नागपूर : एका तरुणाने फेसबुकवर अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. अपहरण करून तिला आपल्या घरी घेऊन गेला. पीडितेचे आई-वडील त्याच्या घरी पोहोचले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी 16 वर्षीय पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. पियूष करण नीलपाल (वय 21, रा. लष्करीबाग) असे आरोपीचे नाव आहे.

    पीडित बालिका नंदनवन परिसरात राहते. फेसबुकवर तिची पियूषशी मैत्री झाली. त्याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नेहमी तिचा पाठलाग करत होता. पीडितेच्या वडिलांना याबाबत समजले. त्यांनी पियूषला फटकारत मुलीपासून दूर राहण्यास बजावले. पियूषने तिच्या वडिलांना पाहून घेण्याची धमकी दिली. दोन दिवसांपूर्वी पीडिता घरी एकटी होती. या दरम्यान पियूष तिच्या घरी आला. आई-वडिलांच्या संरक्षणातून पीडितेचे अपहरण करत सोबत घेऊन गेला.

    याबाबत आई-वडिलांना समजले. दोघेही पियूषच्या घरी पोहोचले आणि मुलीला सोबत येण्यास म्हटले. पियूषने तिच्या आई-वडिलांनाच कापून टाकण्याची धमकी दिली आणि पीडितेला त्यांच्यासोबत जाण्यास मज्जाव केला. अखेर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. पियूष फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.