कर्जाचा वाढता डोंगर, दुष्काळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; विषारी औषध प्राशन करुन संपवले जीवन

दुष्काळ व कर्जाच्या विवंचनेत ५५ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची घटना ऐन दिवाळीच्या कालावधीत घडली. सोयगाव तालुक्यातील पहुरी (बु) येथे ही घटना घडली.

    सोयगाव : दुष्काळ व कर्जाच्या विवंचनेत ५५ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची घटना ऐन दिवाळीच्या कालावधीत घडली. सोयगाव तालुक्यातील पहुरी (बु) येथे ही घटना घडली. प्रशासनाने घटनास्थळी चौकशी करून दुष्काळाचा बळी गेल्याचा (Farmer Suicide) अहवाल गुरुवारी जिल्हा प्रशासनाला पाठवला. त्यामुळे सोयगाव तालुक्यात दुष्काळाचा पहिला बळी ठरला आहे.

    लक्ष्मण जालम करणकाळ (५५) असे विषारी औषध प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पहूरी शिवारात त्यांची एक हेक्टर साठ आर जमीन आहे. त्यांनी कपाशीच्या लागवड केली होती. त्यांच्याकडे सेवा संस्थेसह खसगी बँकेच्या एकूण तीन लाख कर्ज होते. परंतु दिवाळी होऊनही कपाशीच्या उत्पन्नाचे बॉण्डही घरात न आल्यामुळे व दुष्काळाची दाहकता वाढल्यामुळे कर्ज फेडण्याची चिंता भेडसावत होती. त्यामुळे त्यांनी विवंचनेत आल्यामुळे विषारी औषध प्राशन केल्याचा प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाने पाठविला.

    सोयगाव तालुक्यात दुष्काळाचा पहिला बळी ठरला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी जळगावच्या जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात याची नोंद घेण्यात आली. मृत शेतकरी लक्ष्मण करणकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

    दरम्यान, सोयगाव तालुक्यात वीस दिवसांपासून अतितीव्र दुष्काळ जाहीर झालेला आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने अद्यापही शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी कोणत्याही उपाययोजना हाती घेतलेल्या नाही. त्यामुळे सोयगाव तालुक्यात चिंतेची लाट पसरली आहे.