जन्मदात्या बापाकडूनच बारा वर्षीय मुलीवर बलात्कार

शिरुर तालुक्यातील एका ठिकाणी नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना घडली असून, जन्मदात्या बापाकडूनच आपल्या पोटच्या बारा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

    शिक्रापूर : शिरुर तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना घडली असून, जन्मदात्या बापाकडूनच आपल्या पोटच्या बारा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नराधम बापावर गुन्हे दाखल करत नराधमास अटक करण्यात आली आहे.

    अरणगाव (ता.शिरुर) येथील नराधम इसम रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दारु पिऊन घरी आलेला असताना त्याने पत्नीशी भांडणे करत पत्नीला घराबाहेर काढले. त्यावेळी पती दारुच्या नशेत असल्याने सदर महिला वाद नको म्हणून काहीही न बोलता घराबाहेर ओट्यावर अंथरून टाकून झोपली.

    दरम्यान, महिलेची मुले घरात झोपलेली होती. मुलीच्या वडिलांनी मुलीला दमदाटी करत मुलीचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने सदर दाम्पत्यांची बारा वर्षीय मुलगी रडत रडत घराबाहेर झोपलेल्या आपल्या आईजवळ आली. त्यावेळी तिच्या आईने तुला वडिलांनी मारले का? अशी विचारणा केली असता तिच्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यावेळी सदर मुलीच्या आईने घडलेला प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगत नातेवाइकांसह शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत शिक्रापूर पोलिसांना घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देत पिडीत मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

    शिक्रापूर पोलिसांनी सदर नराधम बापावर बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहेत.