मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाजवळील उंच इमारतीला आग, संपूर्ण इमारत करण्यात आली रिकामी

    मुंबई : मुंबईतील भुलाबाई देसाई परिसरात ब्रीच कँडी हॉस्पिटलजवळील (Breach Candy Hospital) एका इमारतीला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारस आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास इमारतीला आग लागली होती. घटनेचं गांभिर्य पाहता या इमारतीमधील सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवीतहानी झाली नसून आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

    नेमकं काय घडलं

    ब्रीच कँडी हॉस्पिटलजवळील एका 14 मजली इमारतीच्या 12व्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये आग लागली, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने  दिली.या इमारतीत काही लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. इमारतीच्या 12व्या मजल्यावरून 2 जणांना  अग्निशमन दलाच्या साहाय्याने शिडीच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. 

    अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई अग्निशमन दलाला रात्री 10.30 च्या सुमारास फोन आला. त्यांनतर घटनास्थळावरुन एक पुरुष आणि एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. आतापर्यंत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. 14 मजली इमारतीच्या 12 व्या मजल्यावर सलग दोन सिलिंडर स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे.  ही आग इतकी भीषण होती की आगीत दोन फ्लॅट जळून खाक झाले आहेत.  लेव्हल-2 ही आग होती,  रात्री 11.45 च्या सुमारास अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने आग आटोक्यात आणली