मुंबईतील भाजप कार्यालयाला भीषण आग! अनेक कागदपत्रे आगीत खाक

मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयाला भीषण आग लागली आहे.

    मुंबई – मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. किचनमध्ये वेल्डिंगच काम सुरु असताना ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

    मुंबईमधील नरिमन पॉइंट येथे भाजपचे प्रदेश कार्यालय आहे. याठिकाणाहून राज्यभरातील भाजप संघटनेचे काम पाहिले जाते. आज कार्यालयात डागडुजीचे काम सुरु होते. यावशी शॉर्टसर्किट होवून आग लागली. या कार्यालयात बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाचेही कार्यक्रम होत असतात. आग लागल्यानंतर धुराचे लोट हवेत पसरत होते. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.

    आज दुपारी 4.35 च्या सुमारास ही आग लागली. ऑफिसमध्ये कागदपत्रे आणि लाकडी फर्निचर असल्याने आगीने अधिकच पेट घेतला आणि त्यामुळे धुराचे लोटही पसरले. आज रविवार असल्याने कार्यालयाला सुट्टी होती पण या कार्यालयातून सोशल मीडियाचं काम चालतं. त्यामुळे तेवढेच कर्मचारी कार्यालयात होते. आग लागल्यामुळे सर्व कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर पडले.