measles

    मुंबईत गोवरचा संसर्ग थांबण्याचं नाव घेत नाही. दररोज गोवरचे नवीन रुग्ण समोर येत असून गोवंडीत गोवर संसर्गामुळे पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत आतापर्यंत गोवर संसर्गामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यू राज्यातील गोवरचा उद्रेक दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

    आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोवंडी परिसरात १३ डिसेंबर रोजी एका पाच महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला होता, त्याचा अहवाल शुक्रवारी आला. या अहवालात या चिमुकल्याचा मृत्यू गोवरामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. शुक्रवारी गोवर संसर्गामुळे ३७ मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर २६ मुलांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या २६ मुलांवर आरोग्य प्रशासनाकडून लक्ष ठेवलं जात आहे. सध्या ही बालकं पूर्णपणे निरोगी आहे.

    मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवर संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४७५ वर पोहोचली आहे. शुक्रवारी मुंबई शहरात पाच मृत्यूही झाले आहेत, हे मृत्यू गोवर संसर्गामुळे झाले आहेत का याचा अहवाल येणं बाकी आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, १० डिसेंबरपर्यंत राज्यात आतापर्यंत १७ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला होता.