नाशिकमध्ये अनाथ आश्रमात चार वर्षीय चिमुकल्याची हत्या

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आलोकचा गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिकदृष्टया निष्पन्न झाल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी सांगितले.

    नाशिक : नाशिक येथील त्र्यंबकेश्वर (Nashik Crime News) रस्त्यावर असलेल्या आधारतीर्थ आश्रमातून (Aadhartirth Aashram) धक्कादायक माहिती समोर येत आहे. येथील अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याचा गळा दाबून हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. आलोक विशाल शिंगारे असे या चिमुकल्याचे नाव आहे.

    नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जात असताना अंजनेरी गावाजवळ आधारतीर्थ आश्रम आहे. या आश्रमात संपूर्ण राज्यभरातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलं राहतात.आलोक हा त्याच्या मोठ्या भावासोबत येथे राहत होता. मंगळवारी सकाळच्या सुमारास आलोकचा मृतदेह आधारतीर्थच्या मागील बाजूस एका सफाई कर्मचाऱ्याला आढळून आला. यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तापसणीसाठी पाठविण्यात आला.आश्रमामध्ये एका लहान मुलाचा खून झाल्याचे प्राथमिकदृष्टया समोर आले आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशाप्रकारे या आश्रमातील मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

    आलोकचा गळा आवळून खून झाल्यांच निष्पन्न

    दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आलोकचा गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिकदृष्टया निष्पन्न झाल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी सांगितले. त्याचबरोबर सद्यस्थितीत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आश्रमातील मुलांची, पदाधिकारी, कर्मचारी वर्गाची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणातील सत्य समोर येईल, अशी माहिती कांगणे यांनी दिली.