ॲप सुरू करून देतो म्हणाला अन् गंडा घालून गेला; गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात !

बंद झालेले फोनपे ऍप (PhonePe App) पुन्हा सुरू करण्यासाठी गुगलवरून ग्राहक सेवेचा संपर्क क्रमांक शोधणे पनवेलमधील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीला गुगलवरून ग्राहक सेवेचा जो मोबाइल नंबर मिळाला, त्यावरून फसवणूक झाली.

    पनवेल : बंद झालेले फोनपे ऍप (PhonePe App) पुन्हा सुरू करण्यासाठी गुगलवरून ग्राहक सेवेचा संपर्क क्रमांक शोधणे पनवेलमधील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीला गुगलवरून ग्राहक सेवेचा जो मोबाइल नंबर मिळाला, त्यावरून बोलणाऱ्या भामट्याने फोन पे सुरू करून देण्याच्या बहाण्याने मोबाईलवर रस्टडेस्क अॅप डाउनलोड करण्यास सांगून, त्याद्वारे त्याच्या बँक खात्यातून परस्पर 60 हजार रुपये (Cyber Crime) काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    पनवेल तालुका पोलिसांनी अज्ञात सायबर याविरोधात या प्रकरणातील तक्रारदार शाहिनाथ विघ्ने (वय 40) हे पनवेल तालुक्यातील डेरवली गावात राहतात. फोन पेच्या ग्राहक सेवा क्रमांकाच्या नावावर सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्यासाठी गुगलवर ठेवलेल्या मोबाईल नंबरवर विघ्ने यांनी संपर्क साधला. त्यावेळी समोरून बोलणाऱ्या भामट्याने फोन पे सुरू करून देण्याच्या बहाण्याने मोबाईलवर रस्टडेस्क हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार, विघ्ने यांनी अॅप डाउनलोड करताच भामट्याने त्यांच्या मोबाईलचा ताबा आपल्याकडे घेतला.

    सायबर चोरट्याने विघ्ने यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकल्यास, फोन पे चालू होईल, असे सांगितले. त्यानुसार विघ्ने यांनी ओटीपी टाकताच त्यांच्या खात्यातून 60 हजार रुपये दुसऱ्या खात्यात वळवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर विघ्ने यांनी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पनवेल तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.