व्हिडीओची धमकी देऊन मित्राच्या मित्रांनी शरीरसुखाची मागणी ; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

मैत्रिणीसोबत जबरदस्तीने केलेल्या शारिरीक संबंधाचा व्हिडीओ काढून तो व्हिडीओ मित्रांना पाठविला. त्यानंतर या मित्रांनी तरुणीला दाखवून तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    पुणे :  मैत्रिणीसोबत जबरदस्तीने केलेल्या शारिरीक संबंधाचा व्हिडीओ काढून तो व्हिडीओ मित्रांना पाठविला. त्यानंतर या मित्रांनी तरुणीला दाखवून तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिडीत तरुणी संबंधित मित्राच्या कुटूंबियाकडे गेल्यानंतर त्यांनीही तिला शिवीगाळकरून मारहाण केल्याची घटना कोंढव्यात घडली आहे.

    याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात रेहान सय्यद त्याचे मित्र शाहरूख शेख व सोहेल पठाण यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २० वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार गेल्या वर्षीपासून सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पिडीत तरुणी व आरोपी रेहान सय्यद हे मित्र आहेत. गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दरम्यान, रेहान याने पिडीत तरुणीशी जबरदस्तीने शारिरीक संबंध निर्माण केले. त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग तरूणीच्या न कळत दुसऱ्याच एका मित्राला करण्यास भाग पाडले. त्यानंतर हे व्हिडीओ शाहरूख व सोहेल यांना पाठविले. त्यांनी पिडीत तरूणीला आमच्याशी शारिरीक संबंध ठेव. अन्यथा आम्ही इतर ठिकाणी हे व्हिडीओ दाखवू अशी धमकी देऊन तिच्याकडे शरिर सुखाची मागणी केली. दरम्यान, पिडीत तरुणी रेहान याच्या कुटूंबियाकडे याची माहिती देण्यास गेली असता त्यांनीही या तरुणीला शिवीगाळ करत तिला मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर या तरुणी पोलीसांकडे तक्रार दिली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.