डेांबिवलीत शेठ लोकांच्या नावावर व्यावसायिकांकडून पैसे उकळणारी टोळी सक्रीय

या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी काही लोकांना अटक केली. अटक आरोपी हा शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात आले होते.

    कल्याण-अमजद खान : फोनवर शेठ बोलतोय समोरच्या व्यक्तिला मदत करा असे भासवून अनेक व्यावसायिकांकडून पैसे उकळले गेले. डोंबिवलीतील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. रमेश म्हात्रे यांच्या नावावर देखील अनेक लोकांकडून पैसे उकळले आहे. विष्णूनगर पोलिसांनी बेघाजी दबाले आणि संदीप शिंदे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यापप्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. धक्कादायक म्हणजे केवळ रमेश म्हात्रेच नाही तर दीपेश म्हात्रे आणि विकास म्हात्रे अशा किती तरी जणांच्या नावावर पैसे उकळले आहेत.

    काही दिवसांपूर्वी भाजपच्या बॅनरवर काळे फासले गेले होते. या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी काही लोकांना अटक केली. अटक आरोपी हा शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणात डोंबिवलीतील माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास अद्याप पोलिसांनी केलेला नाही. डोंबिवलीत असा एक प्रकार समोर आला आहे की, ज्यामध्ये काही तरुण व्यावसायिक नागरीकांकडे जात होते. एका व्यक्तीला फोन लावून द्यायचे. समाेरच्या व्यक्तीला सांगायचे की, फोनवर शेठ बोलत आहे. त्यांनी तुम्हाला आमच्याकडे पैसे देण्यास सांगितले आहे. यांची मागणी केवळ पाचशे, हजार आणि दोन हजार रुपये असायची. लोक प्रतिष्ठीत व्यक्ती फोन करतो म्हणून मदतीच्या नावाखाली पैसे देत होते.

    खरे तर कोणताही शेठ हा यांना फोन करीत नाहीत. मदतही करायला सांगत नव्हता. मात्र बेघाडी दबाले आणि त्यांचे साथीदार लोकांना फसवणून पैसे उकळत होते. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात रमेश म्हात्रे यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या नावाचा वापर करुन देखील अनेक लोकांकडून पैसे घेतले गेले आहेत. रमेश म्हात्रेच नाही तर माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचा नावाचाही वापर पैसे उकळण्यासाठी केला गेला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.