पालखी सोहळ्यात भाविकांचे दागिने चोरणारी सराईतांची टोळी जेरबंद ; गुन्हे शाखेच्या युनिट सहाची धडाकेबाज कारवाई

- पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील १८ गुन्ह्यांची उकल; १३ लाखांचा ऐवज जप्त

  पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुण्यात आगमन झाल्यानंतर दर्शनास आलेल्या भाविकांचे गर्दीतून दागिने चोरणाऱ्या सराईतांच्या टोळीला अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. युनिट सहाच्या पथकाने ही कारवाई केली असून, त्यांच्याकडून तब्बल १८ गुन्ह्यांची उकल करत १३ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. तर, चोरीचे सोने घेणाऱ्या सराफालाही बेड्या ठोकल्या आहेत.

  शंकर शिवाजी पवार (वय २३), महेंद्र सुरेश अरगडे (वय २६) आणि नितीन छगन काकडे (वय २२, रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, चोरीचे सोने घेणारा सराफ प्रशांत छगन टाक (वय २६, रा. पाथर्डी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

  पुण्यातील विश्रांतवाडी, वानवडीमधील प्रत्येकी एक, देहूरोड १३ आणि आळंदीमधील ३ असे एकूण १८ गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यात १३ लाक ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी दिली.
  तिघेही पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अरगडेवर १, शंकर पवार ४ आणि काकडेवर घरफोडीसह इतर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, दोन वर्षांनंतर यंदा पालखी सोहळा दिमाखात पार पडला. दरवर्षी पालखी सोहळ्यात सोन साखळी चोरणारे चोरटे सक्रिय झालेले असतात. भाविकांजवळील मौल्यवान वस्तू चोरून नेतात. पोलीसांकडून पुर्ण खबरदारी घेतली जात असते. परंतु, प्रचंड गर्दी असल्याने पोलीस देखील हतबल होतात. दरम्यान, पुण्यातील दोन गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने व त्यांचे पथक करत होते. यावेळी सोने चोरणारे दोघेजन आळंदी रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यानूसार तिघांना अटककरत सखोल तपास केला असता त्यांच्याकडून तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून २४ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

  चोरट्यांचीही पंढरपूर वारी
  पालखी सोहळ्यासोबत चोरट्यांची देखील पंढरपूर वारी घडत असल्याचे समोर आले आहे. चोरटे आळंदीपासून पालखी सोहळ्यात सामील होता. गाव आल्यानंतर आपसूकच तिथे भाविकांची गर्दी होते. त्याचाच फायदा घेत हे चोरटे चोऱ्या करतात. चोरटे पंढरपूरपर्यंत पालखी सोहळ्यासोबत जाऊन चोऱ्या करतात. दरम्यान, या तिघांकडे त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ते पंढरपूरपर्यंत गेले होते का, याचा तपास केला जात आहे.