एटीएम सेंटरमध्ये गोड बोलून कार्डची ‘ते’ करायचे अदलाबदल अन् पुढं झालं असं काही…

एटीएम सेंटरमध्ये नागरिकांशी गोड बोलून फसवणूक करत एटीएम कार्ड (ATM Card) अदलाबदल करुन लाखोंना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश भिगवण पोलिसांनी (Bhigwan Police) केला. पोलिसांनी तिघांना मुंबई, ठाण्यातून बेड्या ठोकल्या.

भिगवण : एटीएम सेंटरमध्ये नागरिकांशी गोड बोलून फसवणूक करत एटीएम कार्ड (ATM Card) अदलाबदल करुन लाखोंना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश भिगवण पोलिसांनी (Bhigwan Police) केला. पोलिसांनी तिघांना मुंबई, ठाण्यातून बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून 5 लाख 10 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि विविध बँकांची 51 एटीएम कार्ड हस्तगत केली आहेत.

१६ मार्च २०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान भिगवण गावचे हद्दीत प्रभू मेडीकल शेजारी शिवाची हिताची एटीएम सेंटरमध्ये हेमंत बापूराव गोफणे (रा. वाटलूज ता. दौंड, जि. पुणे) हे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, अनोळखी व्यक्तीने त्यांना ‘मी पैसे काढून देतो’, असे सांगून एटीएम कार्डचा पासवर्ड माहिती करून घेतला. जवळील बनावट एटीएम कार्ड गोफणे यांना दिले. त्यानंतर या टोळीने एटीएम कार्डव्दारे ठिकठिकाणाहून गोफणे यांच्या बँक खात्यातून १ लाख ३० हजार ३०० रूपये काढून घेतले. याबाबत भिगवण पोलिसात गोफणे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये अहमद इस्तियाक अली, जैनुल जफरल हसन आणि इरफान रमजान अली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, हे तिघेही उत्तरप्रदेश राज्यातील प्रतापगढमधील रहिवासी आहेत.

भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथक यांना या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण, एटीएम सेंटरमधील कॅमेरे, टोलनाक्याचे सीसीटीसी फुटेजच्या मदतीने आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा शोध लावला. त्याद्वारे अधिक माहिती प्राप्त करून सदर आरोपींना मुंबई, ठाणे या भागातून सिनेस्टाईलने बेड्या ठोकल्या.

5 लाखांचा मुद्देमाल जप्त

या आरोपींकडून पोलिसांनी रोख रक्कम रूपये एक लाख ३० हजार ३०० आणि गुन्ह्यात वापरलेली कार यासह विविध बँकांचे एकूण ५१ एटीएम कार्ड असा एकूण ५ लाख १० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस आता सदरील व्यक्तींकडून मिळालेल्या ५१ एटीएम कार्डच्या आधारे त्याच्या मूळ मालकांचा शोध घेत असून, आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.