मध्यरात्री एकटे फिरणाऱ्या नागरिकांना लुटणारी टोळी जेरबंद ; शहरातील १२ गुन्ह्यांची उकल, ५ जणांना बेड्या

- गुन्हे शाखेच्या युनिट चारची धडक कारवाई

    पुणे : शहरात मध्यरात्री एकट्या नागरिकांना अडवून त्यांना शस्त्राच्या धाकाने लुटणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला असून, पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून तब्बल १२ गुन्ह्यांची उकलकरत २० मोबाईल, २ दुचाकी तसेच इतर असा ऐवज जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली असून, ही टोळी जबरदस्तीने नागरिकांना लुटत होते, असेही तपासात समोर आले आहे.

    किशोर उत्तम गायकवाड (वय १९), अजय उर्फ ओमकार सुरेश गाडेकर (वय २१), आषिश उर्फ बोना संतोष सोजवळ (वय २४), जॉर्ज डॉन्मिक डिसोजा (वय १९) व साहिल उर्फ साहील्या सलीम शेख (वय २१, रा. सर्व बोपोडी, खडकी) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीचे नाव आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार अजय गायकवाड व सारस साळवी यांच्या पथकाने केली आहे.

    शहरात मोबाईल लुटणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यातही मध्यरात्री एकट्या नागरिकांना लुटले जात आहे. यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तेव्हा वरिष्ठ निरीक्षक गणेश माने यांच्या सूचनेनुसार पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार अजय गायकवाड व सारस साळवी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जुना पुणे-मुंबई रोडवरील बोपोडी मेट्रो स्टेशन परिसरात तीन व्यक्ती चोरीचे मोबाईल कमी किंमतीत विकत आहेत. लागलीच या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पथकाने या ठिकाणी सापळा रचून तिघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी एकट्या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटले असल्याची कबूली दिली.

    त्यांना ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता त्यांनी हे गुन्हे साथीदार साहिल व जॉर्ज यांच्या मदतीने केले असल्याचे सांगितले. तसेच, ते दोघे हॅरिस ब्रिजजवळ आहेत, अशीही माहिती दिली. पोलिसांनी लागलीच सापळा रचत या दोघांनाही पकडले. या दोघांकडे ८ मोबाईल मिळाले. पाच जणांच्या टोळीकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी विविध भागात नागरिकांचे मोबाईल लुटले असल्याचे कबूली दिली. त्यांच्याकडून घरफोडीचा एक आणि ११ मोबाईल लुटीचे असे एकूण १२ गुन्हे उघड झाले. त्यांच्याकडून ४ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.