शासकीय कार्यालयांमध्ये हिवाळी अधिवेशनाची धावपळ; रिक्तपदांमुळे कर्मचाऱ्यांवर येतोय ताण अन् रात्री उशिरापर्यंत करावं लागतंय काम…

आगामी 7 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरात सुरू होत आहे. या अनुषंगाने सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोणती माहिती कधी मागितली जाईल, याचा नेम नाही.

    मौदा : आगामी 7 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरात सुरू होत आहे. या अनुषंगाने सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोणती माहिती कधी मागितली जाईल, याचा नेम नाही. त्यामुळेच सध्या अनेक शासकीय कार्यालयांमधील वरिष्ठ तसेच अन्य कर्मचारी सध्या टेन्शनमध्ये दिसून येत आहेत.

    शासनातर्फे मागील अनेक वर्षांपासून कर्मचारी पद भरती न झाल्याने विविध कार्यालयांमध्ये शेकडो पदे रिक्त आहे तर काही कार्यालयांमध्ये कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. महसल, आरोग्य, शिक्षण, कृषी या महत्वाच्या विभागांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याचे दिसून येत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत संगणकावर काम करत असल्याचे चित्र सध्या अनेक शासकीय कार्यालयात दिसून येत आहे.

    शासनाच्या विविध योजना, त्यांची अंमलबजावणी याबाबत अधिवेशनात नेहमीच चर्चा होत असते. त्यासाठी विविध विभागांकडून माहिती घेतली जाते. त्यामुळे देण्यात येणारी माहिती ही अद्यावत देण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेला करावे लागत आहे. परंतु विविध कार्यालयांमध्ये रिक्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी पदामुळे अधिवेशन काळात प्रत्येक विभागाच्या विभाग प्रमुखांना या काळात तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामाचा ताण मात्र वाढला असल्याचे चित्र आहे.