
विसर्जन मिरवणुकीत भरदुपारी तुंबळ हाणामारी झाल्यानंतर सहकारनगर परिसरात याच रागातून चौघा अल्पवयीन मुलांनी एका 17 वर्षांच्या मुलावर कोयत्याने डोक्यात वार (Attack with Koyta) केले. त्यावेळी वार चुकविण्यासाठी त्याने हातमध्ये घातला असता तो वार बोटांवर बसला.
पुणे : विसर्जन मिरवणुकीत भरदुपारी तुंबळ हाणामारी झाल्यानंतर सहकारनगर परिसरात याच रागातून चौघा अल्पवयीन मुलांनी एका 17 वर्षांच्या मुलावर कोयत्याने डोक्यात वार (Attack with Koyta) केले. त्यावेळी वार चुकविण्यासाठी त्याने हातमध्ये घातला असता तो वार बोटांवर बसला. वार इतका जोरात होता की, त्यात त्याचे बोटच तुटून पडल्याची घटना घडली.
विसर्जन मिरवणुकीत शहरात वेगवेगळ्या भागात वादाच्या घटना घडल्याचेही आता समोर आले आहे. राज कैलास चंडालिया (वय 17, रा. इंदिरा गांधी सोसायटी, पद्मावती) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तळजाई वसाहतीत शनिवारी रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीत तक्रारदार व मुलांमध्ये बाचाबाची झाली होती. तो मित्रांसमवेत बोलत थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरुन चौघे जण आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता. त्यांनी शिवीगाळ करुन ‘याला खूप माज आला आहे. हा आपल्याला खुन्नस देतो, याला आज संपवून टाकायचे,’ असे म्हणून त्यांच्याकडील धारदार हत्याराने मारहाण केली. त्यांनी कोयत्याने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो वाचविण्यासाठी हातमध्ये घातला. त्यात त्याच्या हाताचे बोट तुटले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक खंडाळे तपास करत आहेत.
विसर्जनादिवशीही वाद
तत्पूर्वी विसर्जन मिरवणुकीच्या दिवशीच भरदुपारी दोन गटातील किरकोळ वाद व खुन्नसने पाहण्यावरून तुंबळ हाणामारी झाली होती. यामध्ये लहान मुलांसह महिला भरडल्या गेल्या होत्या. या वादाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्याच रागातून पुन्हा मध्यरात्री मुलावर वार करण्यात आले.