कोयत्यासह कुऱ्हाडीने वार करून महाविद्यालयीन तरुणाचा निर्घृण खून; बारामती तालुक्यातील कारखेल येथील घटना

    बारामती : कोयता व कुऱ्हाडीने सपसप वार करीत भरदिवसा महाविद्यालयीन तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना बारामती तालुक्यातील कारखेल या ठिकाणी घडल्याने संपूर्ण बारामती तालुका हादरला आहे. हा महाविद्यालयीन तरुण कारखेल बस स्थानकात बसमधून उतरत असताना पाच अल्पवयीन तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन हा तरुण गतप्राण झाला.
    लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण
    विनोद भोसले असे या मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बारामती शहरात चायनीज खरेदी करण्यासाठी आलेल्या अनिकेत धोत्रे या तरुणावर लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण केल्याने उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच बारामती तालुक्यातील कारखेल या ठिकाणी महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याने बारामती तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
    पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात
    गावातील एका महापुरूषांच्या जयंतीच्या वेळी झालेल्या युवकांच्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन वेगाने तपास सुरू केला आहे. फाईन निवडणुकीच्या धामधुमीत हा गंभीर प्रकार घडल्याने पोलिसांपुढे देखील मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या हल्ल्यातील पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास सुपे पोलीस करत आहेत.