सव्वा पाच लाखांचा गुटखा पकडला; कोंढवा परिसरात पोलिसांची छापेमारी

कोंढवा परिसरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी करत बंदी असणारा सव्वा पाच लाखांचा गुटखा पकडला आहे. येवलेवाडी येथील गोदामातून हा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी नेमाराम लच्छाराम प्रजापती (वय ३८, रा. दत्तविहार सोसायटी, जिल्हा परिषद शाळेजवळ, येवलेवाडी) याला अटक केली आहे.

    पुणे : कोंढवा परिसरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी करत बंदी असणारा सव्वा पाच लाखांचा गुटखा पकडला आहे. येवलेवाडी येथील गोदामातून हा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी नेमाराम लच्छाराम प्रजापती (वय ३८, रा. दत्तविहार सोसायटी, जिल्हा परिषद शाळेजवळ, येवलेवाडी) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन रमेश माळवे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार गुन्हा नोंद केला आहे.

    शहरात बंदी असणारा गुटखा तेजीत आहे. टपऱ्या- टपऱ्यांवर त्याची खुलेआम विक्री होत आहे. पण, एफडीए त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. तर, अनेकांचे हात अर्थपुर्ण बांधलेले आहेत. त्यामुळे यावर म्हणावी तशी कारवाई देखील होत नाही. दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथक कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येवलेवाडी या ठिकाणी एका बंदिस्त जागेत शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ पान मसाला गुटखा हा विक्रीसाठी साठवून ठेवला आहे.

    तो सर्व माल तेथुन विक्रीसाठी नेला जाणार आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर त्याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे व पथकाने या ठिकाणी छापा टाकला. तसेच, नेमाराम प्रजापती याच्या ताब्यातून ५ लाख २९ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.