आरे प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

आरे कारशेडचं सुरु झालेलं बांधकाम थांबवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलीय. पर्यावरणप्रेमींकडून विविध सात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

    मुंबई : मुंबईतील बहुचर्चित आरे कारशेड प्रकरणी (Aaray metro car shed) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) सुनावणी होणार आहे. पर्यावर्णप्रेमींनी दाखल केलेल्या सात विविध यांचिरकांवर आज सुनावणी होणार. न्यायमुर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती एस रविंद्र भट्ट यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.


    गेल्या अनेक दिवसापासून आरेतील मेट्रो कारशेड प्रकरणी वादविवाद सुरू आहे. मेट्रो कारशेड प्रस्तावित जागेतच करण्याला शिंदे सरकारनं हिरवा कंदील दिला आहे. मात्र, हे सुरु झालेलं काम थांबवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. आरे परिसरातील मुख्य मार्गांवरील काही झाडे छाटणी करण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी गोरेगाव चेक नाका ते पवईला जाणारा रस्ता बंद ठेवण्यात आला. मेट्रोचे कोच आणण्यासाठी झाडांची छाटणी सुरू असल्याचा दावा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत होता. आरेमधील मेट्रो कारशेड ज्या ठिकाणी उभे करण्यात येणार आहे, त्याठिकाणी अद्याप वृक्षतोड करण्यात आली नसल्याची माहिती आहे. कारशेडच्या प्रस्तावित ठिकाणी असलेली झाडे अद्यापही कापण्यात आली नाहीत अथवा कोणतेही बांधकाम सुरू झाले नाही. मात्र, मेट्रोच्या बोगीज् आणणार आहेत, त्यामुळे लवकरच कारशेडचे काम सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.