
पुणे : हॉस्टेल व भाड्याने रूम घेऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे लॅपटॉप तसेच मोबाईलसह रूममधील महागड्या वस्तू चोरणाऱ्या उच्चशिक्षित चोरट्याला वारजे माळवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चोरीचे १२ लॅपटॉप, ७ चार्जर, कॅमेरा, दोन दुचाकी असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाची धडक कारवाई
पुण्यातील वारजे माळवाडी, सिंहगड रोड, भारती विद्यापीठ आणि रायगड जिल्ह्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. अर्जुन तुकाराम झाडे (वय २२, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही कारवाई सहायक आयुक्त भीमराव टेळे, वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल जैतापुरकर, गुन्हे निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.
वारजे भागात विद्यार्थ्यांच्या रूममधून लॅपटॉप चोरीला
झाडे हा उच्चशिक्षित आहे. त्याने कृषीविषयक अभ्यासक्रमाची पदवी घेतली आहे. पण, मौजमजा करण्यासाठी त्याने चोरी केल्याचे तो सांगत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत वारजे भागात विद्यार्थ्यांच्या रूममधून लॅपटॉप तसेच इतर साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणातील दाखल गुन्ह्यांचा तपास वारजे माळवाडी पोलिसांकडून सुरू होता. पण चोरट्याचा माग लागत नव्हता.
झाडेला ताब्यात घेऊन विचारपूस
दरम्यान, एका गुन्ह्याचा तपास करताना पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तसेच, तांत्रिक विश्लेषण केले. तेव्हा त्यावरून लॅपटॉप चोरीचे गुन्हे झाडेने केल्याचा संशय आला. त्यानूसार पोलिसांनी झाडेला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या रूमची झडती घेतली. तेव्हा लॅपटॉप व इतर वस्तू दिसून आल्या. पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी लॅपटॉप पाहणी केली असता चोरी गेलेले लॅपटॉप त्याच्याकडे आढळून आले. पोलीसी खाक्या दाखविताच त्याने शहरातील सिंहगड, वारजे तसेच भारती विद्यापीठ भागात लॅपटॉप तसेच यापुर्वी रायगड येथे महाड व माणगाव येथून दोन दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यानूसार पोलिसांनी झाडे याला अटक केली.
चौकट
शिक्षण घेता-घेता चोऱ्याही
अर्जुन झाडे मुळचा बाहेर शहरातील आहे. तो महाड व माणगाव येथे यापुर्वी शिक्षण घेत होता. शिक्षण घेत असताना देखील त्याने त्याठिकाणी चोरट्या केल्याचे समोर आले आले आहे. तेथून त्याने दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे.