हॉटेल व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप

वसंत नगर येथे राहणाऱ्या तरुण व्यावसायिकाने (दि.18) दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वसंत नगर पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

    पुसद : वसंत नगर येथे राहणाऱ्या तरुण व्यावसायिकाने (दि.18) दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वसंत नगर पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मृताच्या कुटुंबीयांनी दिली.

    शेख मुदस्सीर शेख मुनीर उर्फ बब्बू (वय 30, रा. वसंत नगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुण व्यवसायिकाचे नाव आहे. शेख मुदस्सीर शेख मुनीर याने काही दिवसांपूर्वी वसंत नगर मधील एका मशीदजवळ चायनीजचे हॉटेल सुरू केले होते. सोबत तो ड्रायव्हरचेदेखील काम करत होता. तो काही दिवसांपासून स्वतःचे घर सोडून भाड्याच्या घरामध्ये राहत होता.

    घटनेच्या दिवशी तरुण व्यवसायिकाने भाड्याच्या घरात नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती त्याच्याच जवळच्या लोकांकडून शेख मुशीरला दुपारी १ वाजताच्या दरम्यान मिळाली होती. त्याला तत्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.

    सहा महिन्यांपूर्वी झाला विवाह

    शेख मुदस्सीर या 6 ते 7 महिन्यांपूर्वी आयशा सिद्दीकीसोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांच्यात किरकोळ कारणावरून नेहमी भांडण व्हायचे, अशी माहिती मृतकाच्या भावाने वसंत नगर पोलिस ठाण्यामध्ये दिली. घटनेच्या दिवशीदेखील पती-पत्नीमध्ये वाद होऊन भांडण झाले होते. या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची फिर्याद वसंत नगर पोलिस ठाण्यात देण्यात आली.