उत्कर्षा रूपवते आक्रमक, शिर्डीत बंडखोरीची भाषा

माजी खा. वाकचौरे प्रशासकीय अधिकारी होते. कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांनी आपले ‘संबंध’ वापरून शिर्डीतील साई संस्थानचे प्रशासकीय प्रमुखपद मिळविले होते.

    अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्येष्ठ दिवंगत नेते प्रेमानंद रूपवते यांची कन्या उत्कर्षा रूपवते यांनी उमेदवारी मिळावी म्हणून आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांच्या समर्थकांनी बंडखोरी करण्याची भाषा सुरू केली आहे. प्रत्येकवेळी राजकीय अन्याय होत असल्याने उत्कर्षा रूपवते या आता माघार घेतील का बंडखोरी करतील, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

    रूपवते घराणे आणि काँग्रेस हे नाते अत्यंत जवळचे आहे. ज्येष्ठ दिवंगत नेते दादासाहेब रूपवते यांनी अकोले, संगमनेरसह राज्यात विविध ठिकाणी पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिले. मात्र त्यांच्या योगदानाची परतफेड कॉंग्रेसकडून झाली नाही, अशी रूपवते घराण्याची आणि त्यांच्या समर्थकांची भावना आहे. ही भावना दूर करण्यात काँग्रेसलाही कधी यश आले नाही. रूपवते घराण्याचा जिल्ह्याशी विशेषतः दीनदलितांशी चांगला संपर्क आहे. शैक्षणिक संस्था आणि इतर व्यवसायाच्या माध्यमातून दीनदलितांसह इतर समाजातही या घरण्याने वलय निर्माण केले आहे. हे सर्व करत असताना आणि पक्षात देशासह राज्यात पडझड होत असताना त्यांनी मात्र अद्याप निष्ठा सोडलेली नाही.

    दिवंगत नेते प्रेमानंद रूपवते यांना अपवाद वगळता काँग्रेसने कधीही साथ दिली नाही. ते काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते होते. प्रत्येकवेळी पुढचा शब्द देऊन किंवा अन्य आश्वासन देऊन त्यांना शांत करण्यात आले. त्यांनीही पक्षाचा आदेश मान्य करत पक्षाचे इमाने इतबारे काम केले. श्रीरामपूर या आरक्षित विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसने बाहेरून उमेदवार आयात केला, मात्र रूपवते यांचा विचार केला नाही. पक्षाने सांगायचे आणि रूपवते कुटुंबाने ऐकायचे, असे समिकरणच झाले आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत रूपवते यांची बंडखोरी शमेल, असेच मानले जात होते. आता रूपवते घराण्याची तिसरी पिढी उत्कर्षा रूपवते या पक्षाकडून न्याय मिळावा म्हणून संघर्ष करत आहे.

    शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. हा लोकसभा मतदारसंघ यापूर्वी जागावाटपात काँग्रेसकडे होता. मात्र महाविकास आघाडीत आता हा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) यांनी घेतला आहे. या मतदारसंघात ‘उबाठा’ने उमेदवार आयात केला आहे. मात्र हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावा आणि उमेदवारी मिळावी, अशी मागणी व त्यासाठी उत्कर्षा रूपवते यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. वरिष्ठ स्तरावरही यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत होती. मात्र शिवसेनेने (उबाठा) उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली. त्यात शिर्डी मतदारसंघात माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेच्या या यादीवरून राज्यात गोंधळ उडाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी या यादीवरून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

    माजी खा. वाकचौरे प्रशासकीय अधिकारी होते. कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांनी आपले ‘संबंध’ वापरून शिर्डीतील साई संस्थानचे प्रशासकीय प्रमुखपद मिळविले होते. प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरूवातील शिवसेनेची उमेदवारी घेऊन शिर्डी मतदारसंघात विजय मिळविला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकत कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळविली. त्यावेळीही रूपवते यांना शांत करण्यात आले. मात्र त्या निवडणुकीत वाकचौरे यांना पराभव स्वीकारावा लागला. कालांतराने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना श्रीरामपूर या आरक्षित जागेवरून विधानसभेसाठी उमेदवारी दिली. त्यातही त्यांचा पराभव झाला. आता त्यांनी पुन्हा ‘मातोश्री’ गाठून शिर्डीसाठी ‘उबाठा’ची उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. शिर्डी मतदारसंघात रूपवते यांची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे. त्यामुळे आता आक्रमक झालेल्या उत्कर्षा रूपवते यांचा बंडाचा झेंडा किती दिवस टिकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.