मिठाई व्यावसायिकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या; घरात कोणी नसल्याची संधी साधली अन् जीवन संपवलं

अमरावती शहरातील व्यापारी मिलन मिठाई या प्रतिष्ठानचे संचालक अशोक हुशारसिंग शर्मा (60) यांनी आत्महत्या केली. स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडून त्यांनी जीवन संपवल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली.

    अमरावती : अमरावती शहरातील व्यापारी मिलन मिठाई या प्रतिष्ठानचे संचालक अशोक हुशारसिंग शर्मा (60) यांनी आत्महत्या केली. स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडून त्यांनी जीवन संपवल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली. ही घटना खडली माक येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे.

    अमरावती शहरातील व्यापारी अशोक शर्मा यांनी बंदुकीने स्वतःच्या छातीत गोळ्या झाडून जीवनयात्रा संपविली. रविवार संध्याकाळी 6.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. राजापेठ परिसरात त्यांचे मिलन मिठाई नावाचे प्रतिष्ठान आहे. शर्मा यांचे काही नातेवाईक दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता ही घटना उघडकीस आली. शर्मा घरी एकटे असताना त्यांनी कृत्य केले.

    घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजवल्यावरही कोणी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा नातेवाईक विचलीत झाले. त्यांनी कसेतरी घराच्या मागील बाजूच्या खिडकीतून पाहिले असता त्यांना अशोक शर्मा कोसळलेले दिसले. कुटुबीयांनी तत्काळ राजपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या उपस्थितीत घराचा कडीकोंडा तोडण्यात आला. पोलिसांनी पंचानामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.