फेसबुकवर पोस्ट पाहिली, ज्यादा पैशांचा मोह झाला अन् 31 लाखांना मुकला; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील रहिवासी असणाऱ्या एका व्यक्तीची तब्बल 31 लाख 90 हजार रुपयांनी ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.

    अमरावती : ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील रहिवासी असणाऱ्या एका व्यक्तीची तब्बल 31 लाख 90 हजार रुपयांनी ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    तक्रारकर्त्या व्यक्तीला सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला फेसबुकवर एका अज्ञात अकाउंटधारकाने टाकलेली पोस्ट निदर्शनास आली. त्यात ऑनलाइन ट्रेडिंग करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याची जाहिरात होती. त्यानंतर एका अज्ञात व्हॉट्सअॅप युजरने त्यांच्याशी संपर्क साधला. त्या युजरनेसुद्धा तक्रारकर्त्या व्यक्तीला ऑनलाइन ट्रेडिंग करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

    ठकसेनाने त्यांना अमेरिकेतील शिकागो येथील एका आंतरराष्ट्रीय कमर्शियल मॅनेजमेंट कंपनीची वेबसाइट पाठविली. त्यांना त्या संकेतस्थळाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारकर्तेदेखील त्या मोहात अडकले. त्यानंतर ठकसेनाने वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून सव्वा महिन्याच्या कालावधीत तब्बल 31 लाख 90 हजार रुपये उकळले.

    दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून एका व्हॉट्सअॅप युजरसह संकेतस्थळधारकाविरुद्धही फसवणुकीसह माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.