दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून व्यावसायिकाची हत्या; दोन दिवसात तीन हत्याकांडांनी हादरले शहर

वाठोड्यातील दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच कपिलनगर ठाण्यांतर्गतही खुनाची घटना घडली. एका गुन्हेगाराने दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून व्यावसायिकावर चाकूने हल्ला करून ठार मारले.

    नागपूर : वाठोड्यातील दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच कपिलनगर ठाण्यांतर्गतही खुनाची घटना घडली. एका गुन्हेगाराने दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून व्यावसायिकावर चाकूने हल्ला करून ठार मारले. पोलिसांनी घटनेच्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या. मंगेश गणेश मेंढे (वय 45, रा. उन्नती कॉलनी, समतानगर) असे मृताचे नाव आहे. तर राहुल उर्फ दत्तू रमेश रामटेके (वय 19) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

    विशेष म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात खुनाची एकही घटना घडली नव्हती. मात्र, यावर्षी दोन दिवसातच तीन जणांची हत्या झाली. मंगेश वाळूचा व्यवसाय करत होते. सोबतच सट्टा-पट्टीच्या व्यवसायाशीही संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. राहुल विरुद्ध मारहाणीचे गुन्हे नोंद आहेत. त्याचा भाऊही खून प्रकरणात तुरुंगाची हवा खात आहे. राहुल परिसरात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी लोकांना धमकावतो आणि मारहाण करतो. मंगेशने नवीन व्यवसाय सुरू केला असल्याची माहिती त्याला मिळाली होती.

    शुक्रवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास मंगेश टेकानाकाच्या सन्यालनगरात उभे होते. या दरम्यान राहुल त्यांच्याजवळ गेला. दादागिरी करत दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मंगेश यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडून राहुलने चाकू काढून मंगेश यांच्या छातीत भोसकला. परिचितांनी घटनेची माहिती पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिली. पोलिस घटनास्थळावर पोहोचण्यापूर्वीच कुटुंबीय मंगेशला रुग्णालयात घेऊन गेले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.