झोप मोड झाली म्हणून मामाने लहान भाच्याला टाकीत बुडवून ठार मारलं

भाचा रडत असल्याने माझं डोकं दुखतं असं म्हणत मामानेच लहानग्या भाच्याला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार (Crime in Dhule) मारले. हा धक्कादायक प्रकार शहरातील फिरदोस नगरात भरदिवसा घडला.

    धुळे : भाचा रडत असल्याने माझं डोकं दुखतं असं म्हणत मामानेच लहानग्या भाच्याला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार (Crime in Dhule) मारले. हा धक्कादायक प्रकार शहरातील फिरदोस नगरात भरदिवसा घडला असून, याप्रकरणी त्या मामाविरुध्द चाळीसगाव रोड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मरियम बी. एजाज हुसेन (वय २८, रा. फिरदोस नगर, रातराणी चौक, मसुद मशिद जवळ, धुळे) या महिलेने चाळीसगाव रोड पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार, मरियम हुसेन ही दोन मुले आणि पती यांच्यासह फिरदोस नगरात राहत असून, तिचा पती लॅब टेक्नेशियन आहे. मोहम्मद हम्माद (वय ५) आणि मोहम्मद हाजीक (वय ४) अशी दोन मुले तिला आहेत. तिचे आई वडील आणि भाऊ नुरुल अमिन नईम अहमद (वय २२) हे तिच्या घरापासून जवळच राहतात.

    मंगळवारी (दि.५) दुपारी ३ वाजता तिला व तिच्या मुलांना पतीने तिच्या आई वडीलांकडे सोडले व तो कामासाठी बाहेर गेला. मरियम ही आईसोबत घरात बोलत असताना मोहम्मद हाजीक आणि त्याचा मामा नुरुल हे दोघे खेळत होते. थोड्यावेळानंतर मुलाचा आवाज येत नसल्याने मरियमने त्याचा शोध सुरु केला. तिला तिचा मुलगा मोहम्मद हाजीक हा घरातील बाथरुमच्या प्लास्टिकच्या टाकीत वर पाय, खाली डोके अशा अवस्थेत दिसला. त्याला बाहेर काढून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.

    याबाबत मरियमने भाऊ नुरुल याला विचारले असता, त्याने हाजीक रडत होता. त्याच्या रडण्याने माझे डोके दुखत असल्याने मी त्याला ड्रममध्ये टाकून दिले, असे सांगितले. ठार मारल्याप्रकरणी मरियमने नुरुल विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.