accident
accident

    शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. सतिश व्यंकटराव जाधव ( वय ३८, रा. घुणकी, ता. हातकणंगले ) असे त्याचे नाव आहे. तासगाव – संभापूर मार्गावरील अक्षय मेटल या फाऊंड्रीसमोर मंगळवारी (ता. २२) रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. महादेव जाधव यांच्या फिर्यादीवरून मध्यरात्री पावणे तीन वाजता याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

    याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सतिश जाधव हे युनिकाॅर्न दुचाकीवरून काही कामानिमित्त हातकणंगले येथे गेले होते. रात्री उशिरा ते परत येत होते. परत येत असताना तासगाव-संभापूर मार्गावरील अक्षय मेटल या फाऊंड्रीसमोर समोरून येणार्‍या भरधाव वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची मोटारसायकलही चक्काचूर झाली. अपघाताच्या आवाजाने फाऊंड्रीत काम करणारे कामगार बाहेर आले. तोपर्यंत धडक देणारे वाहन घेऊन अज्ञात चालक पसार झाला होता.

    त्यानंतर या घटनेची माहिती शिरोली एमआयडीसी पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली. सतिश जाधव हे अविवाहित होते. त्यांच्या मागे आई व भाऊ असा परिवार आहे.