मित्राला वाचवण्याच्या नादात स्वत:च जीव गमावून बसला; झटापटीत गळ्यात चाकू घुसल्याने तरूणाचा मृत्यू

चाकूने स्वतःला संपविण्याच्या प्रयत्नात असलेल्या मित्राला अडवताना झालेल्या झटापटीत चाकू गळ्यात घुसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना हुडकेश्वर ठाण्यांतर्गत विहीरगाव परिसरात घडली.

    नागपूर : चाकूने स्वतःला संपविण्याच्या प्रयत्नात असलेल्या मित्राला अडवताना झालेल्या झटापटीत चाकू गळ्यात घुसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना हुडकेश्वर ठाण्यांतर्गत विहीरगाव परिसरात घडली. शुभम प्रमोद करवडे (वय 25, रा. पर्ल हेरिटेज) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी शुभमचा भाऊ मनीष करवडे (वय 27) च्या तक्रारीवरून आरोपी मित्र रोहित ज्ञानेश्वर खारवे (वय 24, रा. प्रेमनगर) याला अटक केली.

    मनीष आयटी इंजीनिअर आहे. आरोपी रोहित आणि मनीष या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. मृतक शुभमही बुलढाणाच्या इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. जवळपास आठवडाभरापूर्वी रोहितची अल्पवयीन बहीण घरून बेपत्ता झाली. तेव्हापासून रोहित तणावात होता. 25 जानेवारीच्या रात्रीही रोहित आणि मनीष प्रेमनगर येथे गेले होते. रात्री 10.45 वाजताच्या सुमारास ते घरी परतले. ती बेपत्ता होण्यामागे स्वतःला जबाबदार ठरवत होता. या दरम्यान त्याने अचानक स्वयंपाकखोलीत जाऊन स्वतःला संपविण्यासाठी चाकू आणला.

    मनीष आणि शुभमने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रोहितने मनीषला जोरात धक्का दिला. यामुळे तो भिंतीवर जाऊन आदळला. तो यातून सावरण्यापूर्वीच रोहितने स्वतःला चाकू मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, शुभमने त्याला अडविले. त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागला. या झटापटीत चाकू थेट शुभमच्या गळ्यात घुसला. रक्ताची धार लागली.