विधवा वहिनीशी दीराने सर्वसहमतीने केला विवाह; आता होतंय कौतुक

मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मेस्त्री घराण्यात विधवा वहिनीशी सख्या दीराने विवाह करून शिरोळच्या ऐतिहासिक नगरीत पुरोगामी विचार रुजविण्याचा एक नवा इतिहास घडविण्याचा प्रयत्न मेस्त्री घराण्याने केला आहे.

  शिरोळ : मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मेस्त्री घराण्यात विधवा वहिनीशी सख्या दीराने विवाह करून शिरोळच्या ऐतिहासिक नगरीत पुरोगामी विचार रुजविण्याचा एक नवा इतिहास घडविण्याचा प्रयत्न मेस्त्री घराण्याने केला आहे. याकामी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यात त्यांना यशही आले आहे.

  श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक कै. इसुफसाहेब मेस्त्री यांचे नातू व दत्त कारखान्याचे संचालक कै. अंजुम मेस्त्री यांचे दोन वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यावेळी त्यांना त्यांची पत्नी व तीन महिन्याचे बाळ होते. त्यांची पत्नी सानिया यांचा मेस्त्री परिवारातील सदस्यांनी  आपुलकीने सांभाळ करत आहेत.

  तारुण्यामध्ये अंजुम यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नी सानिया व लहान बाळाचे कसे होणार या विवंचनेत असतानाच अंजुमनचे लहान भाऊ मंजूर या तरुणाने आपली विधवा भावजय सानिया यांच्याशी विवाह करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. विवाह सोहळ्यास भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य फतेलाल मेस्त्री, परवेज मेस्त्री, जयसिंगपूरचे माजी नगरसेवक मुसा डांगे व मेस्त्री परिवारातील सर्व सदस्य आणि हिंदू व मुस्लिम धर्मातील मान्यवर उपस्थित होते.

  आई-वडिलांची संमती

  या कामी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पुढाकार घेऊन मुलाचे वडील रहीम मेस्त्री आई जहअरा मेस्त्री मुलीचे वडील मौला मेहबूब शेख व मुलीची आई आयेशा मौला शेख यांच्याशी सल्लामसलत केली. या ऐतिहासिक निर्णयाला त्यांनी पाठिंबा देत या विवाहास संमती दिली. बुधवारी सायंकाळी सहा वाजता मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे त्यांचा विवाह थाटात झाला.

  समाजासमोर वेगळा आदर्श

  शिरोळमधील मेस्त्री परिवाराने पुरोगामी विचाराला बळ देत घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिवाराचे सर्वत्र कौतुक होत असून पुरोगामी शिरोळ तालुक्याला एक वेगळी नवी दिशा मिळाली आहे.