
जखिणवाडी (ता.कराड) येथे सतत शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून मुलाने वृद्ध पित्याच्या (Old Age Man Killed) डोक्यात लोखंडी पहार घालून खून (Karad Crime) केला. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले आहे.
कराड : जखिणवाडी (ता.कराड) येथे सतत शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून मुलाने वृद्ध पित्याच्या (Old Age Man Killed) डोक्यात लोखंडी पहार घालून खून (Karad Crime) केला. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले आहे.
शिवाजी नारू पाटील (वय ६२ रा. मळाईदेवी मंदिराजवळ, जखिणवाडी ता. कराड) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर याप्रकरणी अर्जुन शिवाजी पाटील (वय ३७) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबतची खबर युवराज बाळू निकम यांनी पोलिसात दिली असून, कराड शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिवाजी पाटील हे जखिणवाडी येथे मळाईदेवी मंदिराजवळ पत्नी रंगुबाई, मुलगा अर्जुन, तसेच मुलीची दोन मुले युवराज व विराज यांच्यासह वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास युवराज जेवण करून झोपण्यासाठी मळाईदेवी मंदिराकडे गेला. परंतु, त्यानंतर काही वेळात त्यांच्या घरासमोर महिलांचा आरडाओरडा सुरू असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे तो घराकडे परत आला असता युवराजचा मामा अर्जुन हातामध्ये लोखंडी पहार घेऊन उभा होता. तर आजोबा शिवाजी पाटील हे जमिनीवर पडले असून त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी युवराजने अर्जुनच्या हातातील पहार हिसकावून घेऊन कोपऱ्यात टाकली. त्यानंतर अर्जुन तेथून घरातून निघून गेला.
घडल्या प्रकाराबाबत युवराज याने त्यांची आजी रंगुबाई यांना विचारणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, शिवाजी पाटील हे जेवण करत असताना अर्जुनला शिव्या देत होते. त्यावेळी रंगुबाई यांनी शिवाजी पाटील यांना गप्प बसा, असे म्हणल्याच्या कारणावरून शिवाजी पाटील यांनी रंगुबाई यांनाही शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरून अर्जुनने शिवाजी पाटील यांच्या डोक्यात लोखंडी पहारीने घातली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले होते.
दरम्यान, युवराजने जखमी शिवाजी पाटील यांना इतर ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. परंतु उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजल्यानंतर कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचा पंचनामा केला. त्याचबरोबर संशयित अर्जुन पाटील यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करीत आहेत.