पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार; घरात घुसून झोपलेल्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे (Crime in Pune) घडत आहेत. असे असताना रविवारी मध्यरात्री खुनाच्या घटनेने पुणे शहर हादरले.

    पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे (Crime in Pune) घडत आहेत. असे असताना रविवारी मध्यरात्री खुनाच्या घटनेने पुणे शहर हादरले. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

    अनिल साहू (वय अंदाजे 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिल साहू हे घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहत होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास अनिल साहू गाढ झोपेत असताना अज्ञात व्यक्ती आले. घरात शिरून त्यांनी साहू यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. हा प्रकार घडला तेव्हा साहू यांचे कुटुंबीय देखील घरात होते. या हल्ल्यानंतर हल्लेखोर तेथे पसार झाले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या साहू यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु

    दरम्यान, या घटनेनंतर खडक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हा हल्ला नेमका का झाला याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.