पांढऱ्या दुधावरील काळे बोके मालामाल! गायीच्या दुधाला किमान ४० रुपये भाव तर म्हशीच्या दुधाला ६० रुपयांची मागणी

लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात दुधाचे उत्पादन घटल्याने दुग्धपदार्थ आयात करावे लागतील असे केंद्रीय मंत्री सांगत असताना महाराष्ट्रातील दुध संघानी महाराष्ट्रात दुधाचा महापूर आल्याचा कांगावा करत दुधाचे भाव ३८ रुपयांवरून पाडत ३१ रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. संगनमत करून दूध संघानी दर पाडल्याने पांढऱ्या दुधावरील मलई खाऊन हे काळे बोके मोठे झाल्याची प्रतिक्रिया दूध उत्पादकांच्यातून उमटत आहे.

    दीपक घाटगे, कोल्हापूर : लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात दुधाचे उत्पादन घटल्याने दुग्धपदार्थ आयात करावे लागतील असे केंद्रीय मंत्री सांगत असताना महाराष्ट्रातील दुध संघानी महाराष्ट्रात दुधाचा महापूर आल्याचा कांगावा करत दुधाचे भाव ३८ रुपयांवरून पाडत ३१ रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. संगनमत करून दूध संघानी दर पाडल्याने पांढऱ्या दुधावरील मलई खाऊन हे काळे बोके मोठे झाल्याची प्रतिक्रिया दूध उत्पादकांच्यातून उमटत आहे.

    दुधाच्या दरात सतत चढउतार होत असल्याने ३५ रुपये दर देण्याबाबत काही अडचणी आहेत का, हे तपासून पाहण्यासाठी समिती गठीत करण्यात येत असल्याचे दुग्ध विकास मंत्र्यांनी नुकतेच सांगितले आहे. प्रत्यक्षात अशा कोणत्याही समितीची आवश्यकता असण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. महाराष्ट्रातील दूध संघ काहीही म्हणत असले तरी लम्पी आजारामुळे देशातील दुधाचे उत्पादन घटले असल्याचे स्वत: केंद्र सरकारनेच जाहीर केले आहे. आवश्यकता पडली तर प्रसंगी विदेशातून दूग्धपदार्थ आयात करण्याची वेळ भारतावर येऊ शकते, असेही केंद्रीय दुग्धविकास विभागाने जाहीर केले आहे. असे असताना एकट्या महाराष्ट्रातच दुधाचा महापूर कोठून आला ? हा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

    दूध उत्पादकांची लूट करण्यासाठी दुधाच्या महापुराचे बहाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवे नाहीत. दूग्ध विकास मंत्र्यांनी ही बाब समजून घेत, समिती स्थापन करून तत्काळ दुधाला ३५ रुपये दर देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

    महाराष्ट्रात संघटीत क्षेत्रात संकलित होणाऱ्या १ कोटी ३० लाख लिटर दुधापैकी तब्बल ७६ टक्के दूध खासगी दूध कंपन्यांकडून संकलित केले जाते. खासगी कंपन्यांवर दराबाबत या कंपन्या अनुदान, बोगस मिल्कोमीटर सारख्या क्लुप्त्यांद्वारे करत असलेल्या लुटमारीबाबत, त्यांना नियंत्रित करणारा कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात नसल्याने सरकारला याबाबत हस्तक्षेपाला मर्यादा येत आहेत. दुधाला किमान ३५ रुपये दर देण्याचे निर्देश खासगी दूध कंपन्यांनी धुडकावल्यास या दूध संघावर कारवाई करण्यासाठी सरकारकडे कोणतेही कायदेशीर हत्यार उपलब्ध नाही. अशा पार्श्वभूमीवर दुधाचे खरेदी दर, भेसळ, लुटमार रोखण्यासाठी खासगी व सहकारी दूध कंपन्यांना लागू असणारा कायदा करणे गरजेचे आहे.

    वाढलेले पशुखाद्याचे दर, मजुरांचा खर्च, वैद्यकीय खर्च, चारा खर्च वजा केल्यास हा दार शेतकऱ्यांना परवडत नाही. गाईच्या दुधाला ४० रुपये पेक्षा जास्त व म्हशीच्या दुधाला ६० रुपयाच्या अधिकचा दर मिळावा, अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे. साखर कारखान्याला जसा एफआरपीप्रमाणे दर दिला जातो, तसाच दर या शेतकऱ्यांच्या दुधाला सुद्धा हमीभाव मिळावा, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

    सरकारकडून हस्तक्षेप करण्यास नकार
    दुध दरांबाबतच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी कोविड सारख्या आपत्तींचा अतिरेकी बाऊ करून दुधाचे खरेदी दर पाडण्याचे प्रकार महाराष्ट्रात वारंवार घडू लागल्याने संपूर्ण दूध क्षेत्र अस्थिर बनले आहे. दूध उत्पादक यामुळे हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दूध दरांबाबत किमान स्थिरता संरक्षण मिळावे, यासाठी दुध उत्पादक दुधाला उत्पादन खर्चावर आधारित एफआरपीचे संरक्षण मिळावे, अशी मागणी करत होते. प्रत्यक्षात मात्र दरांबाबत असा कोणताही हस्तक्षेप करणे शक्य नसल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

    दुध उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत
    यंदा जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील ३ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत. उर्वरित तालुक्यातील काही महसूली मंडळे दुष्काळसदृष्य जाहीर न झाल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. अशातच दुधाचे दर कमी झाल्यामुळे दुध उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना दुधाचा आधार असताना दुधाचा दर कमी झाल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्याच्या दुधाला निश्चित भाव मिळाला तरच बळीराजा जगणार आहे.

    कोल्हापूर जिल्ह्यात सात लाख पशूधन
    कोल्हापूर जिल्ह्यात सात लाखांपेक्षा अधिक पशूधन आहे. त्यापैकी जवळपास अडीच लाख पशूधन पश्चिम तालुक्यात असून सात लाख लिटर दूध संकलन केले जाते. शासनाने गाईच्या दुधाला ३४ रुपये व म्हशीच्या दुधाला ४२ रुपये असा दर जाहीर केला असताना, तसा जीआर सुद्धा काढलेला असताना देखील या जीआर प्रमाणे कुठल्याही दूध संघावर दूध खरेदी हाेताना दिसत नाही. यामुळे सध्या शेतकऱ्यांचे दूध प्रति लिटर सहा ते सात रुपयांनी कमी दराने खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात आला आहे.