अल्पवयीन मुलाकडून 8 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; मोबाईल दाखवण्याचा बहाणा केला अन्…

अल्पवयीन मुलाकडून 8 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आला. मोबाईल दाखवण्याचा बहाणा करत बालिकेवर अत्याचार.

    लाखनी : मोबाईल आणि सोशल मीडियामुळे मानसिक व लैंगिक विकृती किती बळावलीय याचे प्रत्यंतर आणणारी घटना लाखनीत उघडकीस आली. 14 वर्षांच्या मुलाने मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या 8 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने केलेल्या तक्रारीवरून 8 फेब्रुवारीला विधिसंघर्षीत बालकावर गुन्हा दाखल केला आहे.

    पीडित बालिकेचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पीडित व बालक एकाच मोहल्ल्यात एकमेकांच्या आमोरासमोर राहतात. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी मजुरीचे काम आटोपून घरी परतली. हातपाय धुत असताना तिच्या मुलाने तिला घरालगतच्या विधी संघर्षित बालकाने बुधवारी सकाळी 11 वाजता आपल्या घरी येऊन 8 वर्षीय बहिणीला मोबाईल दाखवितो, असे म्हणून लैंगिक अत्याचार केल्याचे आईला सांगितले.

    पीडित बालिकेला विश्वासात घेऊन आईने विचारणा केली असता तिने लैंगिक अत्याचार झाल्याची कबुली दिली. मुलीला घेऊन आईने पोलिस ठाणे गाठले. कर्तव्यावरील पोलिस अधिकाऱ्याला घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून लाखनी पोलिसांनी विधी संघर्षित बालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

    या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड करत आहेत.