संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

सध्या सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. युट्यूब (YouTube) व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. अशाचप्रकारे युट्यूब व्हिडिओ पाहून एका अल्पवयीन मुलीने घरात कोणी नसल्याची संधी साधत स्वत:ची प्रसूती केली आहे.

नागपूर : सध्या सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. युट्यूब (YouTube) व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. अशाचप्रकारे युट्यूब व्हिडिओ पाहून एका अल्पवयीन मुलीने घरात कोणी नसल्याची संधी साधत स्वत:ची प्रसूती केली आहे. त्यामध्ये या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित अल्पवयीन मुलगी ही नागपूरची रहिवासी आहे. ती 15 वर्षांची असून, नववीत शिकत असल्याचे सांगण्यात आले. तर तिची आई खासगी काम करते. या अल्पवयीन मुलीची वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवर ठाकूर नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. दोघे चॅटिंग करायला लागले. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार केला. यातून मुलगी गर्भवती राहिली. ही गोष्ट तिने आईपासून लपवून ठेवली होती. त्यामुळे तिने पुढच्या गोष्टींची माहिती लक्षात घेता तिने यू-ट्यूब बघून प्रसूतीसाठी लागणारे साहित्य जमवून घरात दडवून ठेवले.

बाळ रडू लागले म्हणून…

अल्पवयीन मुलीच्या शुक्रवारी दुपारी पोटात दुखायला लागले. त्यानंतर तिने घरात लपवून ठेवलेले साहित्य बाहेर काढले. यू-ट्यूब बघून तिने स्वत: प्रसूती केली. बाळाला जन्म दिला. मात्र, बाळ रडल्यास शेजाऱ्यांना आवाज जाईल व बिंग फुटेल, या भीतीने तिच्या मनात घर केले. जवळच असलेल्या पट्ट्याने गळा आवळून तिने बाळाचा जीव घेतला.

घरात एकटी असल्याने केलं धाडस

सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर शासकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत. प्रसूती झाली तेव्हा ती घरी एकटी होती. त्यामुळे तिने हे धाडस केले, ते युट्यूब बघून केले असावे, असा पोलिसांचा दावा आहे. मात्र, पीडितेने अजून तरी याबद्दल पोलिसांना माहिती दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.