संस्था चालकाकडून केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील एका निवासी वसतिगृहाच्या संस्था चालकानेच वसतिगृहातील चौदा वर्षीय आदिवासी शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयिता विरोधात पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पंचवटी : म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील एका निवासी वसतिगृहाच्या संस्था चालकानेच वसतिगृहातील चौदा वर्षीय आदिवासी शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयिता विरोधात पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हर्षद बाळकृष्ण मोरे (३२) असे या संशयिताचे नाव आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, रासबिहारी लिंक रोडवर द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रम आहे. गेल्या चार वर्षापासून या संस्थेचे कामकाज नारायण माने नगर येथील एका रो-हाऊस मध्ये कामकाज सुरू होते. या संस्थेचा कारभार संशयित संस्था चालक हर्षद मोरे हा बघत होता. या निवासी वसतिगृहात जवळपास एकूण तीस ते पस्तीस मुले-मुली येथे वास्तव्यास होते.

    मागील महिन्यात या संशयितांने पीडित सोळा वर्षीय मुलीस रात्रीच्या वेळी वसतिगृहातील पार्किंगमध्ये असलेल्या पत्राच्या शेडमध्ये नेऊन हात पाय दाबण्यास सांगितले. त्यानंतर तिला अश्लील व्हिडिओ बळजबरीने दाखवत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपरधपासून संरक्षण अधिनियम अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आदिवासी निर्मूलन सेनेने उघडकीस आणला असून, गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना करीत आहेत.

    सर्व आधार आश्रमांचे ऑडिट करा : चित्रा वाघ
    या संतापजंक प्रकरणानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत सर्व आधार आश्रमांचे ऑडिट व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ट्विट मध्ये चित्र वाघ यांनी म्हटले आहे की, नाशिक म्हसरूळ द किंग फाउंडेशन ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमात संचालकानेच अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीये..गुन्हा दाखल झालाय आरोपीच्याही मुसक्या @nashikpolice नी आवळल्या आहेत दिपाली खन्ना महिला पोलिस अधिकारी अधिक तपास करताहेत…@CMOMaharashtra जी राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट व्हावे.किती आधार आश्रम नोंदणीकृत आहेत आणि किती बेकायदेशीर रीत्या चालवले जाताहेत हे उजेडात आलेच पाहिजे, असे म्हटले आहे.