वर्ध्यात खड्डयांमुळे नऊ वर्षीय मुलानं गमावला जीव

सार्थक घरी न आल्याने कुटुंबियांनी शोध घेतला असता तो खड्ड्यात पडल्याची बाब उघडकीस आली. रात्री दहाच्या सुमारास गावातील एका व्यक्तीला खड्ड्यात उतरवून सार्थकचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला.

    वर्धा : अनेकदा काही कामासाठी खोदण्यात आलेले खड्डे लहान मुलांसाठी धोकादायक ठरत असतात. सूचना फलक न लावल्याने त्यात पडून अनेकदा दुर्घटनाही होतात. असाच काहीसा प्रकार वर्ध्यातील देवळी तालुक्यात घडला आहे. अंगणवाडीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

    देवळी तालुक्यातील पाथरी या गावात अंगणवाडीच्या नवीन इमारत बांधकामासाठी खड्डे खोदण्यात आले आहे. आधीच मुसळधार पाऊस पडत असल्याने हा खड्डा पाण्याने भरलेला होता. अशातच सार्थक घोडाम हा मुलगा खेळताना या खड्डात पडल्याचं सांगण्यात येत आहे. सार्थक घरी न आल्याने कुटुंबियांनी शोध घेतला असता तो खड्ड्यात पडल्याची बाब उघडकीस आली. रात्री दहाच्या सुमारास गावातील एका व्यक्तीला खड्ड्यात उतरवून सार्थकचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.