पुण्यातील ससून रुग्णालयात उंदीर चावल्याने ICU मध्ये असलेल्या रुग्णाचा मृत्यू

पुण्यातील ससून रुग्णालय मागील अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला उंदीर चावल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

    पुण्यातील ससून रुग्णालय मागील अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. अश्यातच आज ससून रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला. आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला उंदीर चावल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णाचे नातेवाईक चांगलेच संतापले. मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव सागर रेणुसे ( वय ३०) असे आहे. त्यामुळे पुण्यातील ससून रुग्णालयात नेमकं काय चालू आहे? असा प्रश्न आता सगळ्यांचं पडला आहे. रुग्णालयाच्या व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

    काही दिवसांआधी सागर रेणुसे या व्यक्तीचा अपघात झाला होता. अपघात घडल्यानंतर त्याला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान हळूहळू सागरची तब्येत खालावत गेली. त्याला नेमकं काय झालं याचा डॉक्टर तपास करत होते. त्यानंतर त्याला उंदीर चावल्याचे समोर आले. उंदीर चावल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी ससून रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सागर आयसीयूमध्ये असताना उंदीर त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना चावला होता. त्यानंतर त्याची प्रकृती खालावत गेली आणि आज सकाळी त्याचा उपचारदरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

    सागर रेणूसेचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात उंदीर चावल्याचा आरोप केला. मात्र डॉक्टरांनी यास नकार दिला. पण अखेर डॉक्टरांनी देखील सागरला उंदीर चावल्याचे मान्य केले. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. उंदीर चावल्याचा आरोप डॉक्टरांनी बराच वेळ मान्य केला नाही, पण संतप्त नातेवाईकांना पाहून डॉक्टरांनी उंदीर चावल्याचे मान्य केले. सागरचा अपघात झाल्याने तो लवकर बरा होऊन घरी परत येईल, अशी अपेक्षा नातेवाईकांना होती. मात्र सागरचा आज सकाळी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. सागरचा उंदीर चावल्याने मृत्यू झाल्यानंतर सगळीकडे रुग्णालयाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे आणि भोंगळ कारभारामुळे सागराला आपला जीव गमवावा लागला आहे.