‘तुम्हा सगळ्या पोलिसांना कामाला लावतो’, म्हणत पोलिस चौकीतच केला आत्महत्येचा प्रयत्न

दौंड तालुक्यातील पाटस पोलीसांनी एका गुन्ह्यातील चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी पोलीस चौकीतच न्यायालयाच्या आदेशाची प्रत सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांच्या हातातून हिसकावून फाडून टाकली. एवढ्यावरच न थांबता अंमलदार यांच्या टेबलावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न करीत 'तुम्हा सगळ्या पोलीसांना कामाला लावतो', अशी धमकी दिली.

    पाटस : दौंड तालुक्यातील पाटस पोलीसांनी एका गुन्ह्यातील चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी पोलीस चौकीतच न्यायालयाच्या आदेशाची प्रत सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांच्या हातातून हिसकावून फाडून टाकली. एवढ्यावरच न थांबता अंमलदार यांच्या टेबलावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न करीत ‘तुम्हा सगळ्या पोलीसांना कामाला लावतो’, अशी धमकी दिली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.

    गणेश किसन कोकरे, प्रशांत धुळा कोकरे व किसन साहेबराव कोकरे (सर्व रा.पाटस (मोटेवाडा) ता.दौंड, जि.पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत. मंगळवारी (दि.१०) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घटना घडली.

    याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पाटस पोलीस चौकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे व पोलीस कर्मचारी हे अमंलदार रूममध्ये एका गुन्हयातील आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी करीत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक वाबळे हे आरोपींना सांगत होते की, तुमच्याविरुध्द दौंड दिवाणी न्यायालयाने यांनी निकाल दिलेला आहे. असे सांगत असताना यातील आरोपी गणेश कोकरे याने वाबळे यांच्या हातातील न्यायालयाच्या आदेशाची असलेली छांयाकित प्रत हिसकावून घेऊन ती फाडून टाकली. ‘तुम्हाला तुमचे काम करू देणार नाही’ असे म्हणत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

    तसेच प्रशांत धुळा कोकरे याने स्वत:चे डोके पोलीस अमंलदार रुममधील लाकडी टेबलवर जोरात आपटले. त्यावेळी वाबळे यांनी त्यास अडविले. त्यावेळी त्याने दोनवेळा जोरा-जोरात टेबलवर डोके आपटून मी येथेच आत्महत्या करुन सर्व पोलीसांना कामाला लावतो, असे जोरजोरात ओरडून शिवीगाळ, दमदाटी केली. तर किसन साहेबराव कोकरे यांनी इतर कागदपत्रे उचलून फेकून दिली.

    याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप कदम यांनी फिर्याद दिल्याने या तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच आत्महत्येची धमकी देत शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.