पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या; काळे आळीतील घटना

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाणातील काळे आळीतील एका खोलीत वास्तव्यास असणारा मुक्ता बहादुर कामी (वय 35) या व्यक्तीने घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

    कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाणातील काळे आळीतील एका खोलीत वास्तव्यास असणारा मुक्ता बहादुर कामी (वय 35) या व्यक्तीने घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी कृष्णा सुरत खतीवाडा (वय 34, रा. तारुका, जी नुवाकोट, नेपाळ. कवठे येमाई, ता.शिरुर) याने शिरूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ही घटना सकाळी उघडकीस आली.

    याबाबत शिरूर पोलिसांना माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पवार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेबाबत शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ता बहादुर कामी याने फिर्यादी यांना फोन करुन सांगितले होते की, त्याला त्याची पत्नी कल्पना व मेहुणा लोकाबहादूर बिका (रा.पुणे) या दोघांकडून त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून मुक्ता याने आत्महत्या केली.

    कृष्णा याने तक्रार दिली आहे. शिरूर पोलिसांत या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले व पोलीस पुढील तपास करीत आहेत.