मराठा जातीसंदर्भात 100 वर्षांपूर्वीचे बातमीचे कात्रण व्हायरल; बातमीत म्हटले आहे की…

सोशल मीडियावर 100 वर्षांपूर्वीच्या एका बातमीचा फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये मराठा, कुणबी याबाबत लिहिण्यात आलेले असून मनुष्यगणती संदर्भात लिहिण्यात आले आहे.

    मुंबई : राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा उपोषणावर बसले असून कुणबी प्रमाणपत्रासाठी (Kunbi certificate) ते आग्रही आहेत. मराठा हेच कुणबी आहेत त्यामुळे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्यावीत अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर 100 वर्षांपूर्वीच्या एका बातमीचा फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये मराठा, कुणबी याबाबत लिहिण्यात आलेले असून मनुष्यगणती संदर्भात लिहिण्यात आले आहे.

    मराठा हेच कुणबी आहेत असे मत मनोज जरांगे पाटील व्यक्त करत आहेत. तर त्यांच्या या मागणीला ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ जोरदार विरोध करत आहेत. कुणबी मराठा नोंद असल्यास प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान शतकापूर्वीची ही बातमी समोर आल्यामुळे अनेकांनी आपली मत व्यक्त केली आहे. यामध्ये मराठा समाजाची मनुष्यगणती अर्थात जनगणना होणार असून याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

    काय आहे बातमीमध्ये ?

    व्हायरल झालेल्या या बातमीमध्ये तारीख स्पष्टपणे दिसत आहे. 26 फेब्रुवारी 1931 च्या वृत्तपत्र, साप्ताहिक किंवा मासिकात छापून आलेली ही बातमी दिसत आहे. बातमी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे, त्याचा उल्लेख नाही. परंतु बातमीची तारीख स्पष्ट दिसत आहे. या बातमीत म्हटले आहे की, वार्षिक मनुष्यगणती (जनगणना) होणार आहे. त्यावेळी जनगणना करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला आपली जात ‘मराठा’, अशी स्पष्टपणे सांगावी. कुणबी, मराठी वगैरे सांगू नये. काही मराठा जातीचे लोक इतर व्यवसाय करतात. त्या व्यवसायावरुन सुतार, लोहार, न्हावी वगैरे जाती सांगतात. सध्या मराठा बांधव शिंपी, सोनार हे व्यवसाय करत आहेत. तरी त्या व्यवसायाची (धंदे) जात न सांगता ‘मराठा’ असाच उल्लेख करावा. गणनेसाठी आलेल्या व्यक्तीला ‘मराठा’ जातच लिहून घेण्यास सांगावे. सुज्ज्ञ जाणत्या मराठ्यांनी अडाणी मराठ्यास जात मराठा असे लिहिण्यास सांगावे. तसेच गणना करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने तसे लिहिले की नाही, याची खात्री करुन घ्यावी. अशा सूचना करण्यात आल्या आहेत.