भीक मागण्यासाठी चक्क पोटच्या मुलीला विकले, पुण्यातील धक्कादायक प्रकार; १५ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, भीक मागण्यासाठी पोटच्या ४ वर्षाच्या मुलीला आई-वडिलांनी केवळ २ हजार रुपयांना विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, भीक मागण्यासाठी पोटच्या ४ वर्षाच्या मुलीला आई-वडिलांनी केवळ २ हजार रुपयांना विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिचा शोध घेत तिचा ताबा असलेल्या एका दाम्पत्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, समाजातील काही तरुणांनी व्यवहाराला विरोध दर्शविला. परंतु, पंचांनी त्यांना कोणी विरोध केला व पोलिसांकडे गेला तर जातीबाहेर काढू, असा जात पंचायतीने निर्णय दिला. या सर्व पंचायत सदस्यांची दहशत असल्याने व ते व्याजाने पैसे देत असल्याने घाबरुन सर्व जण बसले आहेत.

    याबाबत अ‍ॅड शुभम शंकर लोखंडे (वय २६, रा. वैदुवाडी, हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मरीआई देववाले समाजातील १० पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वकिल आहेत. त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना माहिती दिली की, एक महिला गेल्या २ महिन्यांपासून कल्याणीनगर तसेच विमाननगर भागात ४ ते ५ वर्षाच्या मुलीला घेऊन भीक मागत आहे. भीक मिळाली नाही तर तिला मारहाण करते. त्यांनी अधिक माहिती घेतली असता अहमदनगरमधील एका दाम्पत्याला ६ मुली आहेत. त्यांच्याकडून या तिघांनी समाजातील पंचाच्या सहमतीने २ हजार रुपयांना विकत घेतली. त्यासाठी जात पंचायतीने पैसे घेतल्याची माहिती मिळाली.

    समाजातील चौघा जणांनी त्या मुलीला विकत घेऊ नये, यासाठी विरोध केला. परंतु, समाजातील १० पंचांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. त्याला मान्यता दिली. विरोध करणाऱ्यांना जातीचे बाहेर काढू असा जात पंचायतीने निर्णय दिला. त्यानंतर तक्रारदारांना ही बाब समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन माहिती दिली.

    पोलिसांनी ही मुलगी ताब्यात असलेल्या दोघांना अटक केली. दरम्यान, आपण मुलीला दत्तक घेतल्याचा दावा या मुलीचा ताबा असलेल्या दाम्पत्याने केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नांगरे तपास करीत आहेत.