विहिरीत पडल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू; कन्नड तालुक्याच्या मोहरा परिसरात हळहळ

कन्नड तालुक्यातील मोहरा येथील 22 वर्षीय गर्भवती महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. पल्लवी दिनेश गाडेकर असे या महिलेचे नाव आहे. पल्लवी गाडेकर यांचा दोन वर्षांपूर्वी दिनेश यांच्यासोबत विवाह झाला.

    नाचनवेल : कन्नड तालुक्यातील मोहरा येथील 22 वर्षीय गर्भवती महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. पल्लवी दिनेश गाडेकर असे या महिलेचे नाव आहे. पल्लवी गाडेकर यांचा दोन वर्षांपूर्वी दिनेश यांच्यासोबत विवाह झाला. पती दिनेश हे सैन्यात नोकरी करतात. पल्लवी ही आठ ते नऊ महिन्यांची गर्भवती होती. एकाच वेळी दोन जीवांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    गाडेकर कुटुंब हे मोहरा शिवारात डोंगर पायथ्याशी वास्तव्यास होते. गट नंबर १५० मधील राजेंद्र गाडेकर यांच्या मालकीच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस पाटील दिनेश जयस्वाल यांनी पिशोर पोलीस ठाण्यात माहिती कळविल्याने पिशोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी पंचनामा केला. प्रथम या महिलेस नाचनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, रात्र झाल्याने डॉक्टर नसल्यामुळे त्यांना संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    डॉक्टरांनी तपासून या महिलेस मृत घोषित केले. शनिवारी त्यांच्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मोहरा येथील शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बडे करीत आहेत.